Bigg Boss Marathi fame Bhushan Kadu : पडद्यावर कलाकार विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामधून त्यांना लोकप्रियताही मिळते. पण, त्यामुळे बऱ्याचदा ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात किती आनंदी आहेत, त्यांचं कसं सगळं छान सुरू आहे, असा समजही निर्माण होतो. सेलिब्रिटींना सर्व सोई-सुविधा मिळतात याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. पण, त्यासाठी त्यांनाही संघर्ष करावा लागतो आणि काही वेळेला पडद्यावर हसवणारे कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र खूप कठीण परिस्थितीतून जात असतात. असंच काहीसं घडलेलं भूषण कडूबरोबर.
भूषण कडू मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यानं आतापर्यंत नाटक, मालिका आणि चित्रपटांतून विविध भूमिका साकारत त्याच्या विनोदी शैलीनं अनेकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातही सहभाग घेतला होता. परंतु, गेले काही दिवस तो मनोरंजन क्षेत्रापासून दूर होता. खरं तर भूषणच्या आयुष्यात मधल्या काळात मोठं संकट आलं होतं. भूषणची पत्नी कादंबरी हिचं निधन झालं. त्यानंतर तो खचून गेला आणि मधला बराच काळ अभिनेता कुठेच दिसला नाही. पत्नीबद्दलची माहिती त्यानं स्वत: ‘लोकमत फिल्मी’ला दिली होती.
‘बिग बॉस मराठी’बद्दल काय म्हणाला भूषण कडू?
अशातच आता ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत भूषण कडूनं ‘बिग बॉस’ आणि त्याच्या नवीन नाटकाची माहिती दिली आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वात तू आम्हा सगळ्यांना हसवलंस आणि घरातील तुझा संपूर्ण खेळ खूप वेगळा होता. पण, तेव्हा ज्या पद्धतीनं बिग बॉसच्या घरात स्पर्धक खेळायचे, तसा खेळ आता राहिला आहे का, असं विचारल्यानंतर भूषणनं तो सध्या टीव्ही वगैरे बघत नाहीये. त्याच्याकडे यासाठी वेळ नाही, असं म्हटलं.
भूषण म्हणाला, “आता माझ्या पायाच्या शस्त्रक्रियेमुळे मला फार टीव्ही वगैरे पाहायला मिळत नाहीये; पण मी बघण्याचा प्रयत्न करेन. कारण- मी पाहिलंच नाहीये, तर खोटं मत देणं योग्य नाही. कारण- जे आतमध्ये आहेत, तेसुद्धा सेलिब्रिटी आहेत. पण, मला ते पाहायला न मिळाल्यामुळे मी खंत व्यक्त करतो. कारण- पहिल्या पर्वाचा स्पर्धक असल्यानं ते पाहता येत नसल्याची खंत आहे. मी यापुढचे काही एपिसोड पाहिल्यानंतर प्रतिसाद कळवेन.”
नवीन नाटकातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
भूषण कडूला पुढे तू कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेस, असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “एक नवीन नाटक लिहिलं आहे. ते नाटक विनोदी, रहस्यमय व हॉरर असं आहे. आपल्या समाजातील काही गोष्टींवर म्हणजे काही गोष्टी कशा असाव्यात आणि कशा नसाव्यात यावरसुद्धा भाष्य करणारं ते नाटक आहे. माझ्या नाटकाच्या सेटची गंमत आहे. सेट हवेलीसारखा आहे. त्याच्यामध्ये बस धडकून आतमध्ये येते. तिथे अडकलेले काही प्रवासी आतमध्ये येतात आणि तिथून गोष्ट पुढे जाते. ते नऊ प्रवासी नऊ दिवस त्या हवेलीतच अडकून राहतात. खरं तर आतमध्ये अडकवून ठेवायचं ही संकल्पना बिग बॉसवरूनच सुचली आहे. मग त्यांच्यामध्ये काय काय घडतं, त्यांचे संवाद हे सगळं पाहायला मिळतं. शेवटी ते त्यांच्या त्यांच्या घरी निघून जातात. असं ते व्यावसायिक सुटसुटीत नाटक आहे.”
