Bhushan Shivatare and Ashvini Mahangade at Jejuri temple: भूषण शिवतारे आणि अश्विनी महांगडे यांनी २४ ऑक्टोबर २०२६ ला लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याचे, संगीतातील काही खास क्षण पाहायला मिळाले.
अश्विनी महांगडे व भूषण शिवतारे पोहोचले जेजुरीत
आता भूषण शिवतारेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, अश्विनी व भूषण जेजुरीला गेले आहेत. तिथे ते देवदर्शन घेतात. शेवटी अश्विनी भूषणच्या पाया पडत असल्याचे दिसत आहे. तसेच, शेवटी ते दोघेही भंडारा उधळतात. हा व्हिडीओ शेअर करताना भूषणने त्याच्या भावना व्यक्त केल्या.
भूषण शिवतारेने लिहिले, “लग्नानंतरचं पहिलं देवदर्शन, श्री खंडेरायाच्या चरणी मी आणि माझी अर्धांगिनी अश्विनी नतमस्तक. जेजुरी गडावर पोहोचलं की मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. भंडाऱ्याचा दरवळ, मुखातून निघणारा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष आणि त्या पिवळ्या धमक वातावरणात मनाला लाभणारी शांतता हे सगळं शब्दांत मांडणं खरंच कठीण आहे.”
पुढे त्याने लिहिले, “देवदर्शन म्हणजे केवळ मंदिरात जाऊन नतमस्तक होणं नाही तर आपल्या मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्याशी मनमोकळा संवाद साधणं आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा एकदा अनुभवणं. आमच्या संसारात प्रेम, विश्वास, एकमेकांबद्दल आदर आणि प्रत्येक परिस्थितीत सोबत राहण्याची ताकद कायम असू दे हेच मागणं; येळकोट येळकोट जय मल्हार!”
अश्विनी व भूषण यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत येळकोट येळकोट जय मल्हार असे लिहिले आहे, तर अनेकांनी जोडी खूप सुंदर आहे असे लिहिले आहे; तर बऱ्याच जणांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
दरम्यान, अश्विनी व भूषण यांच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्सचा वर्षाव करत आहेत. तसेच, त्यांच्या जोडीचेही कौतुक करत आहेत.
