छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या शोमुळे अनेकांना लोकप्रियता मिळाली. असाच ‘बिग बॉस’ हिंदीच्या १७ व्या सीझनमधून घराघरांत पोहोचलेला स्पर्धक म्हणजे मुनव्वर फारुकी. ‘बिग बॉस १७’चा तो विजेताही ठरला होता. यानंतर त्याने आणखी काही रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.
मुनव्वर एक स्टँड-अप कॉमेडियन म्हणूनही लोकप्रिय आहे. लोकांना हसवण्याऱ्या मुनव्वरचे बालपण मात्र खूप संघर्षमय होते. नुकत्याच एका मुलाखतीत मुनव्वरने बालपणीच्या आर्थिक परिस्थिती सांगितली. तसेच आईच्या निधनाबद्दलही त्याने भावुक प्रतिक्रिया दिली.
युवा यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मुनव्वर म्हणाला, “माझ्या अवतीभवती अनेकांचे बालपण उद्ध्वस्त होत होते. मी वाईट मार्गाला लागलेली माणसे कशी बर्बाद होतात, हे जवळून पाहिले आहे. माझ्या घराच्या अगदी मागे दारूची भट्टी होती. तिथे नेहमी भांडणे आणि मारहाण झालेली पहायचो. मला त्याची लहानपणी खूप भीती वाटायची.”
तो पुढे म्हणाला, “दारूमुळे होणारी कुटुंबांची वाताहात मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे, मला लहानपणीच समजले होते की हे व्यसन वाईट आहे. मी देवाचे आभार मानतो की, मी आजवर कधीही दारू किंवा अमली पदार्थाला स्पर्श केला नाही. माझ्या धर्मातही हे सांगितलंय की, व्यसन करू नये. तसेच व्यसनांमुळे होणाऱ्या परिणामांचे वास्तव देवाने मला वेळेत दाखवून दिले, त्यामुळे मी त्यापासून लांब राहिलो. हे माझे भाग्य आहे.”
यापुढे मुनव्वरने आपल्या बहिणींचे लग्न आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “मी १० वर्षांचा असताना माझ्या एका बहिणीचे लग्न झाले, दुसरीचे ११ व्या वर्षी आणि मी १३ वर्षांचा असताना तिसऱ्या बहिणीचे लग्न झाले. त्याचवर्षी माझ्या आईचे निधन झाले. तेव्हा मी पूर्णपणे एकटा पडलो होतो. मी माझ्या मावशीकडे राहायचो. आयुष्यात काहीतरी मोठे करायचे हे मी तेव्हाच ठरवले होते. मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत आलो, तेव्हा पहिल्या दिवशी मी फक्त ६० रुपयांसाठी भांडी घासण्याचे काम केले. गेल्या ६-७ वर्षांत आर्थिक स्थैर्य आले. त्यामुळे मी पुन्हा माझ्या बहिणींच्या आणि कुटुंबाच्या अधिक जवळ आलो आहे.”
आपल्या शिक्षणाबद्दल बोलताना मुनव्वरने सांगितले की, वयाच्या ९ व्या वर्षी त्याने काम करायला सुरुवात केली. यामुळे त्याला ११ व्या वर्षी शाळाही सोडावी लागली होती. तो दिवसाला १२-१४ तास काम करायचा. मुनव्वरचे वडील स्वतः ड्रायव्हर होते, पण त्यांची इच्छा होती की मुनव्वरने कधीही ड्रायव्हर बनू नये.
याबद्दल मुनव्वर म्हणाला, “माझे वडील मला कधीच गाडी चालवू द्यायचे नाहीत. मी गाडी शिकण्याची इच्छा व्यक्त केली तरी ते नकार द्यायचे. मोठे झाल्यावर मला समजले की, त्यांनी आयुष्यभर ड्रायव्हर म्हणून काम केले होते. मी गाडी चालवायला शिकलो तर मीही ड्रायव्हरच बनेन, अशी भीती त्यांना वाटत होती. त्यामुळेच ते मला गाडी चालवायला देत नव्हते,” असे त्याने सांगितले.
