Jahnavi Killekar Talks About Bigg Boss Marathi 6 Fame Raqesh Bapat : ‘बिग बॉस मराठी’ सीझन सहा आता शेवटाकडे आला आहे. त्यामुळे या पर्वाचा विजेता कोण होणार याची उत्सुकता ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धकांसह प्रेक्षकांमध्येसुद्धा आहे. खेळ शेवटाकडे आला असला तरीसुद्धा स्पर्धकांमधील वाद-विवाद अजूनही कायम आहेत. सहाव्या पर्वामध्ये काही स्पर्धक सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिले आहेत. या यादीत तन्वी कोलते, विशाल कोटियन, राकेश बापट यांसारख्या काही स्पर्धकांचा समावेश आहे. ‘बिग बॉस’मध्ये पूर्वी भाग घेतलेले कलाकारसुद्धा सीझन सहामधील स्पर्धकांबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचची फायनलिस्ट जान्हवी किल्लेकरनंसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
जान्हवीनं आत्तापर्यंत मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. ती खऱ्या अर्थानं प्रसिद्धीझोतात आली ते ‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचमुळे. त्यामुळे जान्हवी नेहमीच ‘बिग बॉस’ प्रती असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत असते. अशातच आता तिनं सीझन सहामधील काही स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘लोकमत फिल्मी’ दिलेल्या मुलाखतीमध्ये जान्हवी याबद्दल बोलली आहे.
‘बिग बॉस मराठी’ सीझन सहाबद्दल जान्हवी किल्लेकरची प्रतिक्रिया
जान्हवीला मुलाखतीत “तू बिग बॉस मराठीचा सहावा सीझन पाहत असशील, बरेच जण पाचव्या आणि सहाव्या पर्वाची तुलना करत आहेत तुला याबद्दल काय वाटतं?” असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “तुलना तर होणारच. आमचं पर्व सुरू झालं होतं तेव्हासुद्धा तुलना केली जायची. त्यामुळे तुलना तर होतेच. पण, मला असं वाटतं की प्रत्येक सीझन काहीतरी नवीन घेऊन येत असतो. म्हणून मला असं वाटतं की लोकांनी नवीन पद्धतीनेच त्याकडे पाहावं मागच्या पर्वात असं होतं या पर्वात ती विशिष्ट गोष्ट नाहीये अशी तुलना करू नये. आमच्या सीझन मधल्या लोकांचे स्वभाव वेगळे होते. या पर्वातील लोकांचे सर्वांचेच स्वभाव तापट आहेत. आमच्या पर्वातील काही जण शांत होते काही अती आगाऊ होते ज्यामध्ये माझासुद्धा समावेश आहे खरंतर. या पर्वातील लोकांचे स्वभाव वेगळे आहेत, खेळण्याची पद्धत वेगळी आहे, स्वतःला प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे मला मज्जा येतेय शो पाहायला.”
जान्हवीला पुढे विचारण्यात आलं की, “या पर्वातील कोणता सदस्य तुला आवडतो आणि तू कोणाला पाठिंबा देतेस का?” त्यावर ती म्हणाली, “मी खरंतर कोणालाही पाठिंबा देत नाहीये. कधीतरी एखादा सदस्य चांगला वाटतो, पण नंतर तो काही चुका करतो आणि मनातून उतरतो. त्यामुळे माझा सध्या तरी कोणताही आवडता स्पर्धक नाही. त्यामुळे मी कोणालाही पूर्णपणे पाठिंबा देत नाहीये. जे चुका करत आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतीये. पण, मला नाही वाटत मी कोणाला पाठिंबा देईन.”
राकेश बापटबद्दल जान्हवी किल्लेकर काय म्हणाली?
पुढे तिला हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतलेल्या राकेश बापट, राखी सावंत आणि विशाल कोटियनबद्दल त्यांना अनुभवी असतानाही त्यांचा गेम प्लॅनिंग कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं का आणि विशाल-राकेशबद्दल तुझं मत काय आहे असं विचारल्यानंतर जान्हवी म्हणाली, “दोघेही वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आहेत. राकेश प्रचंड तापट आहे असं मला वाटतं. पण कधी कधी तो शांत होतो आणि विचार करतो त्यामुळे तो समजूतदार वाटतो. पण, कधी कधी काही चुका होतात अर्थात माणूस आहे त्यामुळे राग येतोच. पण, दोघांमध्ये फार फरक आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये तुलना मी नाही करू शकत.”
