Bigg Boss Marathi Season 6 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या चांगलाच रंगतोय. स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस रंगली असून, दररोज बिग बॉसच्या घरात नवीन ड्रामा पहायला मिळतोय. रविवारच्या एपिसोडमध्ये प्रभू शेळके आणि संकेत पाठक हे दोघे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. आता उरलेल्या स्पर्धकांपैकी अंतिम फेरीपर्यंत कोण जाणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांबद्दल एक्स स्पर्धकसुद्धा त्यांचे मत व्यक्त करताना दिसतात. एखाद्याचा खेळ आवडल्यास त्याचे जाहीरपणे कौतुकही करतात. अशातच बिग बॉसमधल्या अनुश्री मानेचं एक्स स्पर्धक किरण माने यांनी कौतुक केलं आहे. तसेच अनुश्रीनेच या शोच्या विजेतेपदाची ट्रॉफी उचलावी, अशी इच्छासुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.
अनुश्री मानेबद्दल किरण माने काय म्हणाले?
अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या मुलाखतीत किरण माने म्हणाले, “मला अनुश्री मानेचा खेळ आवडत आहे. सगळ्या गेमर लोकांना ती पुरून उरत आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान, अशी ती आहे. ती माने आहे किंवा साताऱ्याची आहे म्हणून माझं तिच्याबद्दलचं हे मत आहे, असं नाही. खेळाडू म्हणून मला तिचा ‘बिग बॉस’च्या घरातला खेळ आवडत आहे. मध्यंतरी तिने राकेशशी पंगा घेतला होता. टोळी सोडली होती. असं बंड करणारे बंडखोर लोक मला आवडतात. ‘बिग बॉस’च्या घरात सगळेच गेमर आहेत; पण समोरच्या स्पर्धकाच्या एखाद्या डावावर प्रतिडाव कसा टाकायचा हे तिला बरोबर कळतं. तिला प्रत्येकाचा खेळ माहीत आहे.”
विशाल कोटियनबद्दल किरण माने म्हणाले…
यापुढे किरण मानेंनी विशाल कोटियनचंही कौतुक केलं. ते म्हणाले, “अनुश्रीप्रमाणेच विशालसुद्धा चांगला खेळत आहे. विशाल विचारांनी खूप खंबीर आहे. समोरच्याला आपल्या तालावर नाचवून कसं खेळायचं हे त्याला बरोबर येतं. त्यामुळे बाहेर त्याची प्रतिमा नकारात्मक असली तरी तो ‘बिग बॉस’चा खेळ व्यवस्थितपणे खेळत आहे. बाकी तन्वी कोलते, दीपाली सय्यद यांच्या ग्रुपला होस्टनेच उचलून धरलं आहे. होस्टने कौतुक केलं की स्पर्धकांचा आत्मविश्वास आणखी वाढतो. त्यामुळे ते आपोआपच चांगले वाटायला लागतात. कठीण परिस्थितीतही चांगलं खेळ खेळणारे स्पर्धक मला आवडतात. ज्यांना होस्टची साथ नाही, कुणाचीच साथ नाही तरी ते उत्तम खेळतात, अशी माणसं मला कायमच आवडतात.”
त्यानंतर किरण माने यांना ट्रॉफी कुणी उचलावी, असं वाटतं हा प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी अनुश्रीचं नाव घेतलं. ते म्हणाले, “अनुश्रीनं ट्रॉफी जिंकावी, असं मला वाटतं. तिला मिळेल की नाही माहीत नाही; पण मिळावी अशी माझी इच्छा आहे. पण तिनं ट्रॉफी जिंकली नाही तरी ती पुढे जास्त चांगलं करिअर करेल, असं मला वाटतं.”
