Usha nadkarni Talks About Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चं सध्या सहावं पर्व सुरू आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही पर्वात असे काही स्पर्धक आहेत, जे आरडाओरडा करून त्यांचा खेळ खेळत असतात. बऱ्याचदा मोठ्याने बोललो आणि सतत भांडणं केली, तर आपली चर्चा होते, असा स्पर्धकांचा समज असतो. त्याबद्दल अनेक कलाकारही बोलताना दिसतात.

‘बिग बॉस’च्या आधीच्या पर्वांमध्ये सहभागी झालेले अनेक कलाकार याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया, मतं व्यक्त करीत असतात. अनेक जण सोशल मीडियामार्फत ‘बिग बॉस’च्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल बोलत असतात. अशातच आता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीसुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. उषा नाडकर्णी यांनी ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्याच भागात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्या खूप चर्चेत राहिल्या होत्या. घरात असताना त्यांचेही काही स्पर्धकांबरोबर खटके उडाले होते.

उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?

उषा नाडकर्णी नेहमी कुठल्याही विषयाबद्दल त्यांच्या स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. त्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अशातच आता ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. आताच्या पर्वाबद्दल विचारल्यानंतर उषा म्हणाल्या, “मी शो बघत नाहीये. आमचं पर्व संपल्यानंतर मी फक्त दुसरं पर्व मधे पाहिलं होतं; पण तेव्हा मी ७० वर्षांची असूनही कधी मी ज्येष्ठ आहे म्हणून हे करणार नाही, ते करणार नाही, असं म्हटलं नाही; पण काही स्पर्धक ५० वर्षांचे असतानाही मी खूप सीनियर आहे. मी काम करणार नाही, असं म्हणतात. मी आजही माझ्या घरी सर्व कामं करते. घरी आपण आपलं वय जास्त आहे म्हणून काम करणं थांबवतो का; मग शोमध्ये का बोलतात?”

‘बिग बॉस’मध्ये जाऊन चूक केली की, त्या गोष्टीचा फायदा झाला काय वाटतं, असं विचारल्यानंंतर त्या म्हणाल्या, “फायदा झाला म्हणजे पैसे मिळाले एवढंच. बाकी लोक तर मला आधीपासूनच ओळखतात. त्यामुळे ‘बिग बॉस’ केलं म्हणून लोक मला ओळखतात, असं काही नाहीये; पण मला त्रास झाला. मेंदुला किडे लागले, ते वागणं पाहून.”

उषा यांना पुढे सध्याच्या पर्वातील कोणते स्पर्धक आवडतात आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल, असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “मी काही सांगून ते ऐकणार आहेत का आणि तुम्ही हे त्यांना दाखवायला जाणार आहात का? प्रत्येक जण त्याच्यावर जशी परिस्थिती येते, त्यानुसार वागतो.”