‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार आणि ‘गुलीगत किंग’ सूरज चव्हाण एकत्र सहभागी झाले होते. शोमध्ये सगळेच धनंजयला ‘डीपी दादा’ म्हणायचे. सूरजचं सुद्धा डीपीशी खूप चांगलं बॉण्डिंग तयार झालं होतं. मात्र, शो संपल्यावर हे बॉण्डिंग तसंच राहिलेलं नाहीये. सूरजच्या नव्या घरात फर्निचर गिफ्ट देईन असं आश्वासन धनंजयने पोवारने दिलं होतं, पण प्रत्यक्षात असं घडलं नाही, त्यामुळे सोशल मीडियावर डीपीला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. यानंतर धनंजयने सविस्तर व्हिडीओ शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली होती, आणि आता नुकत्याच दिलेल्या पॉडकास्टमध्येही डीपीने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे.

धनंजय पवार ‘द मराठी फाऊंडर’ या पॉडकास्टमध्ये म्हणाला, “सूरज एका व्हिडीओमध्ये म्हटला होता की, डीपी दादा मला सोफा सेट गिफ्ट देणार आहेत…तर मी म्हटलं, ठिक आहे देतो. बिग बॉसच्या वेळेला हे सगळं ठरलं होतं. मग त्यानंतर सोफा त्याच्या घरी पाठवताना जरा पत्ता वगैरे कळत नव्हता असा सगळा विषय झाला. मग, मी म्हटलं आता तुझं लग्न वगैरे होऊदेत मग सोफा देऊयात. पण, जेव्हा मी आदल्या दिवशी त्याच्या घरी गेलो होतो…तेव्हा पाहिलं तर तिथे सोफा सेट आधीच होता. त्याला कोणीतरी गिफ्ट दिला होता. बरं तो खूप छान सोफा होता, डायनिंग टेबल सुद्धा त्याला भेट म्हणून आला होता. आता ज्यांनी त्याला या भेटवस्तू दिल्या…त्यांनी व्हिडीओ शेअर केले मग सर्वत्र चर्चा सुरू झाली. आम्हाला वाटलं डीपी दादांनी हे सगळं दिलंय, डीपी दादा खोटारडा आहे…अशा कमेंट्स येऊ लागल्या.”

धनंजय पुढे म्हणाला, “मग, मला समजलं की, अजित दादांनी सूरजच्या नव्या घरी सोफा वगैरे सगळंच पाठवायला सांगितला होतं… हे जेव्हा मला समजलं, त्यावेळी मग मी सूरजला काय बोललो. एक काम कर…. एक व्हिडीओ बनव किंवा स्टोरी शेअर कर.. आणि सर्वांना सांग…की हे सगळं दादांनी आधीच खास माझ्यासाठी पाठवलं म्हणून मी डीपी दादाकडून परत काही घेतलं नाही, याची मला गरज भासली नाही. यावर सूरज म्हणाला, मी कसं बोलू? म्हटलं राहूदेत बाबा…तुझे विचार तुझ्याकडे! त्यानंतर मग मी एक व्हिडीओ बनवून शेअर केला. कारण, लोक मला शिव्या देत होते. मला त्याची ही गोष्ट पटली नव्हती.”

“सूरजची ती गोष्ट मला पटली नव्हती. एकदा माणूस मनातून उतरला की उतरला…मी चांगल्या मनाने त्याला सगळं काही देणार होतो आणि मग जो काही गैरसमज झाला त्यानंतर मग लोक माझी इज्जत काढत होते, धनंजय पवार खोटारडा आहे म्हणत होते… म्हणून माझं इतकंच म्हणणं होतं की, एकदा काय घडलं ते खरं सांग…बरं खोट वगैरे सांग असं मी त्याला कधीच म्हटलं नव्हतं, जे काही आहे ते खरं सांगायचं होतं. सूरज असा वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी त्यालाही हे सांगितलं. मग, तिथून मी स्वत:हून त्याच्याकडे परत गेलो नाही” असं धनंजयने स्पष्ट केलं.