बिग बॉसमध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे स्पर्धक चर्चेत असलेले दिसतात. आता बिग बॉस १६ मध्ये सहभागी झालेला ताजिकिस्तानचा गायक अब्दू रोझिक आता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.
“…त्यामुळे हा निर्णय घेतला”
ई टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अब्दू रोझिकने त्याचे लग्न मोडले आहे. काही महिन्यांपूर्वी अमिराबरोबर त्याचा साखरपुडा झाला होता. अब्दू याविषयी बोलताना म्हणाला, “आमचे नाते जसे पुढे जात होते, तसतसे आम्हाला समजले की आमच्यात सामाजिक, सांस्कृतिक फरक आहे, त्यामुळे आम्ही लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.” आतापर्यंतच्या आयुष्यात त्याला आलेल्या अनुभवाचा त्याच्या नात्यावर प्रभाव पडल्याचेदेखील अब्दू रोझिकने सांगितले आहे.
अब्दू रोझिकने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हटले, “अनेक जण मला याबद्दल विचारत आहेत, हो हे खरं आहे, आयुष्यात अशा गोष्टी होत असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर जास्त वेळ घालवता, जास्त चर्चा करता, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल जास्त समजते. काहींचं म्हणणं आहे की मी हे प्रसिद्धीसाठी केलं. पण, जर असं असलं असतं तर मी माझ्या होणाऱ्या पत्नीचा फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला असता. जे घडलं ते घडलं, आता मी आयुष्यात पुढे जाईन. आता मला तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. मला इतकं प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद”, असे म्हणत लग्न मोडल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
काही महिन्यांपूर्वीच त्याचा अमिराबरोबर साखरपुडा झाला होता, त्यामुळे तो चर्चेत आला होता. २० वर्षीय अब्दूने काही दिवसांपूर्वीच अंगठीचे फोटो दाखवत त्याच्या लग्नाची घोषणा केली होती.
अब्दूने ११ एप्रिल रोजी त्याच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले, “अलहमदुलिल्लाह, २४/०४/२०२४” पहिल्या फोटोत अब्दू त्याच्या पारंपरिक पोशाखात दिसत आहे आणि त्याच्या हातात अंगठी दिसतेय. त्याची होणारी पत्नी अमिरा त्याच्या शेजारी बसली आहे. अमिरानं सफेद रंगाचा पोशाख परिधान केला होता. दुसऱ्या फोटोत अब्दू त्याच्या पत्नीला अंगठी घालताना दिसतोय. शारजाह, यूएई (Sharjah, UAE)मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला होता.
दरम्यान, बिग बॉस १६ मध्ये त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. याबरोबरच त्याच्या अनेक गाण्यांबरोबरच ‘छोटा भाईजान आया’ या गाण्याचीदेखील मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.