scorecardresearch

प्रियांका गांधींच्या PA विरोधात ‘बिग बॉस’ फेम अर्चना गौतमच्या वडिलांची पोलिसांत तक्रार, नेमकं प्रकरण काय?

प्रियांका गांधींच्या PAवर अर्चना गौतमच्या वडिलांचे गंभीर आरोप

priyanka gandhi pa
प्रियांका गांधींच्या PA विरोधात तक्रार दाखल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस’ फेम अर्चना गौतम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मनोरंजन विश्वाप्रमाणेच अर्चना गौतम राजकारणतही सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा स्वीय सहाय्यक (PA) असलेल्या संदीप सिंहवर अर्चनाने गंभीर आरोप केले होते. आता अर्चनाच्या वडिलांनी संदीप विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मेरठमधील परतापूर स्थानकात अर्चनाच्या वडिलांनी संदीपविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अर्चनाला जातीवाचक वक्तव्य व धमकी दिल्याप्रकरणी संदीपविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीसी कलम ५०४, ५०६ व एससी एसटी अॅक्ट अंतर्गत संदीप सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अर्चना गौतमचे वडील म्हणाले, “अर्चना खूप दिवसांपासून प्रियांका गांधीला भेटण्याचा प्रयत्न करत आहे. पण संदीप सिंह तिला प्रियांका गांधींपर्यंत पोहोचू देत नाहीये. २६ फेब्रुवारीला संदीप सिंहने प्रियांका गांधीच्या सांगण्यावरुन रायपूरमध्ये आयोजित केलेल्या काँग्रेसच्या महाअधिवशेनासाठी अर्चनाला बोलावलं होतं. अर्चनाने प्रियांका गांधींना भेटण्याची विनंती केली होती. पण संदीप सिंहने तिला प्रियांका गांधींना भेटू दिलं नाही”.

हेही वाचा>> हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुश्मिता सेनची ‘अशी’ आहे अवस्था, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

अर्चनाबरोबर त्याने उद्धटपणे भाष्य केल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. याशिवाय अर्चनाला जातीवाचक वक्तव्य व धमकी दिल्याचा आरोपही अर्चनाच्या वडिलांनी केला आहे. रायपूर सत्रानंतर अर्चनाने फेसबूक लाइव्हद्वारे संदीप सिंहवर आरोप केले होते.“रायपूर सत्रादरम्यान संदीपने मला धमकी दिली. जास्त बोललीस तर तुरुंगात टाकेन, असं तो मला म्हणाला”, असा आरोप अर्चनाने केला होता. संदीप सिंहने अर्चनाला प्रियांका गांधींची भेटही घेऊ दिली नसल्याने अभिनेत्री फेसबुक लाइव्हच्या माध्यम्यातून त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. “संदीप सिंहवर संपूर्ण काँग्रेस पक्ष नाराज आहे. महिलांशी तो नम्रपणे बोलत नाही”,असं अर्चना म्हणाली होती.

हेही वाचा>> Video: “नवऱ्याचं निधन होऊन…” होळी साजरी केल्यामुळे मंदिरा बेदी ट्रोल

अर्चनाने संदीप सिंहवर आरोप केल्यानंतर तिच्या जिवाला धोका असल्याचं अभिनेत्रीच्या वडिलांनी म्हटलं होतं. अर्चनावर हल्ला होण्याची भीती व्यक्त करत तिच्या वडिलांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. अर्चना बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या पर्वाच्या टॉप ५ फायनलिस्टपैकी एक होती. तिने २०२२ मध्ये हस्तिनापूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. परंतु, तिला विजय मिळवता आला नव्हता. ‘बिग बॉस’च्या घरातही तिने उत्तम राजकारणी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 13:16 IST