Anurag Dobhal Health Update : ‘बिग बॉस १७’ मधील एक्स स्पर्धक अनुराग डोभालचा नुकताच भीषण अपघात झाला. शनिवारी, इन्स्टाग्राम लाईव्ह असताना गाझियाबादमधील दासना येथे त्याची कार डिव्हायडरवर आदळली आणि त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये त्यानं स्वतःला एकटं वाटत असल्याचं आणि मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली असल्याचं सांगितलं. नंतर त्याने अचानक कारचा वेग वाढवला आणि काही क्षणांतच कारचा वेग ताशी सुमारे १५० किलोमीटरपर्यंत गेला. वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याचा अपघात झाला.

अनुरागच्या या भीषण अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसच त्याचे चाहतेसुद्धा काळजीत आहेत. अशातच आता अनुरागच्या पत्नीनं त्याची हेल्थ अपडेट दिली आहे. अनुरागची पत्नी ऋतिका चौहान हिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याच्या प्रकृतीबाबत माहिती देत तो सध्या सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

Award Banner

अनुरागच्या अपघाताबद्दल पत्नीची प्रतिक्रिया

ऋतिका आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, “अनुराग सध्या ठीक आहे. त्याला काही दुखापती झाल्या आहेत, पण तो लवकरच बरा होईल. सध्या आमच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे. कृपया कोणत्याही अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नका. या क्षणी आम्हाला सर्वांच्या प्रार्थना, पाठिंब्याची गरज आहे. या कठीण काळात आमच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.”

Anurag Dobhal wife Ritika Chauhan Post
अनुराग डोभालच्या प्रकृतीबद्दल पत्नीने दिली अपडेट

अनुरागच्या प्रकृतीबाबत मॅनेजरची प्रतिक्रिया

अनुरागच्या प्रकृतीबाबत त्याच्या मॅनेजरनेही इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माहिती दिली होती. त्यानं सांगितलेलं, “अनुरागचे जवळचे मित्र, वहिनी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या त्याच्याबरोबर रुग्णालयात आहेत. तो अजून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. कृपया कोणत्याही अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नका. आपण सर्वजण त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करू.”

इन्स्टाग्रामवरील लाईव्हमध्ये अनुरागनं भावुक होत “आई, पुढच्या जन्मात आलो तर मला फक्त प्रेम दे. मला प्रेमाची खूप गरज होती. आता फोन करायला कुणीही उरलेलं नाही”, असं म्हटलं होतं. यानंतर जवळपास अर्धा तास तो आपल्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत राहिला. शेवटी ‘लेट्स गो फॉर द फायनल ड्राइव्ह’, असे म्हणत त्याने कार वेगात चालवायला सुरुवात केली आणि काही वेळातच त्याचा अपघात झाला.

अपघात होण्यापूर्वी काही काळ अनुराग मानसिक त्रासात असल्याचं सांगत होता. त्यामुळे आता अनुरागचा हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.