Anurag Dobhal Health Update : ‘बिग बॉस १७’मधील एक्स स्पर्धक अनुराग डोभालचा गेल्या आठवड्यात भीषण अपघात झाला. इन्स्टाग्राम लाईव्ह करत असताना गाझियाबादमधील दासना येथे त्याची कार डिव्हायडरवर आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अशातच त्याच्या प्रकृतीबद्दलची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्याची प्रकृती सध्या खालावली असून त्याला न्यूमोनिया (Severe Pneumonia) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याबद्दल अनुरागच्या मॅनेजरनेच माहिती दिली आहे.
अनुरागला नेमकं काय झालंय?
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अनुरागचा मॅनेजर रोहित पांडेने सोशल मीडियावर माहिती दिली की, “आज सकाळपर्यंत अनुरागची प्रकृती स्थिर होती, पण अचानक ती बिघडली आहे. अपघातामुळे त्याच्या फुफ्फुसांना दुखापत झाली होती, तिथे आता गंभीर इन्फेक्शन झाले असून त्याला न्यूमोनियाचे निदान झाले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.”
काही दिवसांपूर्वीच अनुरागला आयसीयू (ICU) मधून बाहेर आणण्यात आले होते, मात्र आता त्याची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाली असल्याचे त्याच्या मॅनेजरने म्हटलं आहे. यामुळे अनुरागचे अनेक चाहते आता काळजी व्यक्त करत आहेत.
इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये अनुरागने स्वतःला एकटं वाटत असल्याचं आणि मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली असल्याचं सांगितलं. नंतर त्याने अचानक कारचा वेग वाढवला आणि काही क्षणांतच कारचा वेग ताशी सुमारे १५० किलोमीटरपर्यंत गेला. वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याचा अपघात झाला. या लाईव्हमध्ये त्याने भावुक होत भावुक होत “आई, पुढच्या जन्मात आलो तर मला फक्त प्रेम दे. मला प्रेमाची खूप गरज होती. आता फोन करायला कुणीही उरलेलं नाही”, असं म्हटलं होतं.
अनुरागच्या भावाचे गंभीर आरोप
अनुरागचा भाऊ कलम इंक (अतुल डोभाल) याने मात्र वेगळाच दावा केला आहे. अतुलच्या मते, “आई-वडिलांविरुद्ध केलेली केस हरल्यानंतर अनुराग हे सर्व नाटक करत आहे. त्याला फक्त प्रसिद्धी हवी आहे. अशा वागण्यामुळे त्याची पत्नी रितिकाही त्याला सोडून गेली.” तसंच अनुरागच्या काही समर्थकांकडून आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोपही अतुलने केला आहे.
पत्नी रितिकाने केली सूचक पोस्ट
दरम्यान, अनुरागची पत्नी रितिकाने या वादावर मौन सोडत एक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले, “सोशल मीडियावर दिसणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. शेवटी आपलं कर्मच महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी दुय्यम असून ‘धर्म आणि कर्म’ हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे.”
मॅनेजर रोहितने सध्या कौटुंबिक वादावर बोलण्यास नकार दिला असून, अनुरागची प्रकृती सुधारणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. अनुरागच्या प्रकृतीबद्दल त्याचे अनेक चाहते काळजी व्यक्त करत आहेत.
