Bigg Boss 19 Ashnoor Kaur Eviction : ‘बिग बॉस १९’ चा ग्रँड फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या रविवारी म्हणजेच ७ डिसेंबर रोजी शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस असतानाच या घरातील एका स्पर्धकाला घराबाहेर पडावं लागलं आहे. ही स्पर्धक म्हणजे, अशनूर कौर.
शनिवारच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने सुरुवातीलाच अशनूरला तिची चूक दाखवून दिली आणि तिच्या या चुकीमुळे ती शो बाहेर जात असल्याचं जाहीर केलं. ‘तिकीट टू फिनाले’ टास्कसाठीच्या टास्कमध्ये अशनूरनं ‘बिग बॉस’चा महत्त्वाचा नियम मोडला, तो म्हणजे इतर स्पर्धकाला जाणीवपूर्वक दुखापत करण्याचा.
टास्कमध्ये अशनूरनं तान्या मित्तलच्या अंगावर लाकडी फळी उगारली. सुरुवातीला अशनूरनं मी तिला पाहिलं नसल्याचं म्हटलं. तसंच मी हे जाणीवपूर्वक केलं नाही, हेही तिनं स्पष्ट केलं. मात्र, ‘बिग बॉस’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान तो व्हिडीओ पुन्हा दाखवत तिनं केलेली ही कृती जाणीवपूर्वक असल्याचं म्हटलं आणि तिला घराबाहेर काढलं. यामुळे ग्रँड फिनालेच्या आधीच अशनूरला घर सोडावं लागलं.
‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच अशनूरनं पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अशनूर म्हणते, “परिस्थिती समजून न घेता दिलेली प्रतिक्रिया म्हणजे एखादी खोटी गोष्ट विकण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. एक क्षण चुकीचा समजला गेला आणि आजवरच्या संपूर्ण प्रवासावर पडदा पडला.” तसंच अशनूरनं तिच्या घरातील बाल्कनीमधला एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, “एका कठीण वादळानंतर मिळालेली शांतता.”
दरम्यान, अशनूर कौरचा या घरातील प्रवास खूपच कठीण होता. याआधी ती घरबाहेर जाणार होती. मात्र प्रणित मोरेच्या एका निर्णयाने ती या स्पर्धेत टिकून राहिली. पण टास्कदरम्यान एक चूक केली आणि ती चूकच अशनूरला महागात पडली आहे. तान्यावर उगारलेल्या लाकडी फळीमुळे तिला या घरातून बाहेर पडावं लागलं आहे.
