Bigg Boss 19 Mid Week Eviction Updates : टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. शो सुरू होऊन आतापर्यंत ८० दिवस झाले आहेत, त्यामुळे आता लवकरच या शोचा ग्रँड फिनाले प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मागच्या आठवड्यात शोमध्ये डबल एविक्शन झाले, ज्यात विजेतेपदाचा दावेदार मानला जाणारा अभिषेक बजाज बाहेर पडला. तसंच नीलम गिरी हिचा बिग बॉसमधील प्रवासही संपला.

या दोघांच्या एलिमिनेशनबाबत प्रणित मोरेकडे महत्त्वाचा निर्णय देण्यात आला होता. त्याच्या एका निर्णयाने अभिषेक बाहेर पडला, याबद्दल अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक जण हा निर्णय योग्य नसल्याचं मत व्यक्त करीत आहेत. अशातच आता शोमधील आणखी एक सदस्य बाहेर झाल्याची बातमी समोर आली आहे.

या आठवड्यात होणार मिड-वीक एविक्शन

‘फिल्म विंडो’नुसार, या आठवड्यात ‘बिग बॉस १९’मध्ये मिड-वीक एविक्शन होणार आहे. सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की कुनिका सदानंद आणि प्रणित मोरे हे दोघेही ‘डेंजर झोन’मध्ये आहेत आणि त्यापैकी एकजण बाहेर जाण्याची शक्यता आहे. पण, नव्या माहितीनुसार, बाहेर होणारे स्पर्धक हे दोघे नसून मृदुल तिवारी आहे

अर्थात, याबाबत अद्याप अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण, तरी मृदुल शोमधून बाहेर आला तर हे त्याच्या प्रेक्षकांसाठी शॉकिंग ठरेल; कारण मृदुलला आतापर्यंत प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद आणि प्रेम मिळत होतं. आपल्या चाहत्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांच्या वोट्समुळे मृदुल बिग बॉसच्या या प्रवासात इथपर्यंत पोहोचला आहे.

दरम्यान, शोचा होस्ट सलमान खाननं याआधी अनेक वेळा मृदुल तिवारीला इशारावजा सूचना दिल्या होत्या की मृदुल शोमध्ये पुरेसं योगदान देत नाहीये. तसंच अनेक मुद्द्यांवर त्यानं बोलायला हवं, स्वत:चं मत व्यक्त करायला हवं; पण तो अनेकदा शांत बसतो. दुसऱ्यांच्या बोलण्यात येऊन निर्णय घेतो. अशातच आता त्याच्या बाहेर जाण्याची माहिती समोर येत आहे. आता मृदुलच्या एविक्शनबाबत योग्य ती अपडेट आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. तो खरंच शोमधून जाणार की फिनालेपर्यंत मजल मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘बिग बॉस १९’च्या सध्या आहेत ‘हे’ १० स्पर्धक

अभिषेक बजाज आणि नीलम गिरी बाहेर गेल्यानंतर सध्या ‘बिग बॉस 19’ च्या घरात एकूण १० स्पर्धक बाकी आहेत. गौरव खन्ना, फरहाना भट्ट, कुनिका सदानंद, तान्या मित्तल, अमाल मलिक, शहबाज बदेशा, अशनूर कौर, प्रणित मोरे, मालती चाहर आणि मृदुल तिवारी हे १० स्पर्धक आहेत. यापैकी कोण शेवटपर्यंत टिकणार आणि कुणाचा प्रवास मध्येच संपणार, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.