Pranit More and Malti Chahar Reunite : ‘बिग बॉस’च्या घरातली भांडणं ही तशी काही नवीन नाहीत. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये भांडण होतं. कालांतराने भांडण झालेल्या स्पर्धकांची मैत्रीसुद्धा होते. असंच यंदाच्या ‘बिग बॉस १९’मध्ये प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात भांडण झालेलं आणि त्यांची पुन्हा मैत्री व्हावी यासाठी ‘बिग बॉस’मधील प्रणितच्या मित्रांनीच पुढाकार घेतला आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अखेरच्या दिवसांत मालती आणि प्रणितमध्ये बाचाबाची झाली. मस्करी करताना प्रणितनं केलेल्या कृतीमुळे मालतीला राग आला आणि तिनं त्याच्याशी बोलणं टाळलं. नंतर त्याचदिवशी मालती घराबाहेर पडली. घराबाहेर जातानाही तिनं प्रणितची भेट घेतली नव्हती. शिवाय ‘बिग बॉस’ संपल्यानंतरदेखील दोघांची भेट झाली नव्हती. मात्र, आता या दोघांत पुन्हा मैत्री झाली आहे.

‘बिग बॉस’चा १९’वा सीझन संपून जवळपास महिना झाला. मात्र, या शोमधील स्पर्धकांची मैत्री आजही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच गौरव खन्ना, अशनूर कौर, प्रणित मोरे, आवेज दरबार यांनी दुबईत एकत्र येऊन पार्टी केली. यावेळी त्यांच्यासह मालती चहरही पाहायला मिळाली. अशनूरनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मालती पाहायला मिळाली होती

‘बिग बॉस १९’मधील भांडणानंतर अखेर दुबईच्या गेट-टूगेदर निमित्ताने प्रणित-मालती यांच्यात मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांची पुन्हा मैत्री व्हावी, यासाठी त्यांचे मित्र अशनूर आणि आवेज यांनी पुढाकार घेतला. आवेजनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो प्रणितला मालतीशी बोलण्यासाठी सांगत आहे.

आवेज आणि अशनूर प्रणितला बोलवतात आणि त्याला मालतीशी बोलण्यासाठी सांगतात. आवेज त्याला म्हणतो की, “प्रणित तू तुझ्या मैत्रिणीशी बोल. टाइमपास नको करूस. आत्ताच्या आत्ता मैत्रिणीशी बोल.” यानंतर आवेज-अशनूर प्रणितला मालतीच्या शेजारी बसवतात. मग अखेर प्रणित मालतीशी बोलतो.

सुरुवातीला प्रणित मालतीशी बोलण्यासाठी थोडा संकोच करीत असतो. पण, आवेज आणि अशनूरच्या सांगण्यावरून तो मालतीशी बोलतो. त्यावर मालतीदेखील त्याच्याशी बोलते. त्याच्या बदललेल्या लूकबद्दल ती त्याला विचारते. दोघांच्या या मैत्रीसाठी घरातील स्पर्धक उत्सुक होते, तसंच अनेक चाहतेसुद्धा याची वाट बघत होते. दोघांनी बोलावं असं त्यांच्या चाहत्यांना वाटत होतं आणि अखेर आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झालीय, असं म्हणायला हरकत नाही.