Pranit More Dubai Flight Funny Story : ‘बिग बॉस १९’ हा शो संपला असला तरी या शोची आणि शोमधल्या स्पर्धकांची चर्चा अजूनही सुरूच आहे. शोमधील स्पर्धक सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत आहेत. काहीच दिवसांपूर्वी मुंबईत ‘बिग बॉस १९’च्या स्पर्धकांची एक पार्टी झाली. त्यानंतर आता हे स्पर्धक पुन्हा दुबईतल्या पार्टीसाठी गेले आहेत. याच दुबईच्या प्रवासादरम्यानचा एक खास किस्सा प्रणित मोरेने शेअर केला आहे.

‘बिग बॉस १९’चा ग्रँड फिनाले मागील महिन्यात पार पडला असला, तरीही सेलिब्रेशन अजून संपलेलं दिसत नाहीय. या रिअॅलिटी शोमधील विजेता गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, तान्या मित्तल, अश्नूर कौर, अभिषेक बजाज, आवेज दरबार, बसीर अली, नेहल चूडासामा आणि इतर स्पर्धक नुकतेच दुबईत एका पार्टीत सहभागी झाले. याच दुबई प्रवासादरम्यानचा मजेशीर किस्सा प्रणितनं सांगितला आहे.

प्रणित म्हणाला, “मी कधीच विमानाच्या बिजनेस क्लासनं प्रवास केला नाहीय. मी नेहमीच शिवनेरी बसने प्रवास केला आहे. त्यात तुम्ही सीट मागे घेतली तर ती मागे बसलेल्या प्रवाशाला लागते. आता मी दुबईला येत असताना विमानातून बिजनेस क्लासनं आलो, तर मला ती सीट मागे कशी घेतात तेच कळत नव्हतं. त्यात मला इंग्रजीसुद्धा येत नाही. कसंतरी करून मी एअर हॉस्टेसला बोलावलं आणि मी तिला इंग्रजीत ‘मला झोपायचं आहे’, असं म्हणालो. यावर ती घाबरूनच गेली. मग मी तिला ती सीट खाली कशी घेतात असं विचारलं. तिने ते करून दाखवलं. तेव्हा तिलादेखील कळलं की मी किती गरीब आहे.”

Award Banner

बिग बॉस १९ फेम प्रणित मोरे इन्स्टाग्राम पोस्ट

प्रणितनं सांगितलेल्या या किस्स्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस १९’मध्ये एकमेव मराठी स्पर्धक सहभागी झाला होता. प्रणित हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. त्यानं नेहमीच त्याच्या विनोदी शैलीनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अशातच त्याने दुबई प्रवासाचा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी मुंबईत आयोजित केलेल्या सक्सेस पार्टीनंतर, सगळे स्पर्धक दुबईला रवाना झाले. ही दुसरी सक्सेस पार्टी शोचे स्पॉन्सर डॅन्यूब प्रॉपर्टीज यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.