Bigg Boss 19 Pranit More : ‘बिग बॉस’ हिंदीच्या १९ व्या पर्वाचा विजेता अभिनेता गौरव खन्ना ठरला आहे. यंदाच्या पर्वाचा विजेता प्रणित मोरे व्हावा अशी असंख्य ‘बिग बॉस’ प्रेमींची इच्छा होती. मात्र, प्रेक्षकांचा लाडका ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ तिसऱ्या क्रमांकावर शोमधून एलिमिनेट झाला. यामुळे प्रणितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रणित मोरे स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि काही लोकप्रिय मराठी कलाकारांनी प्रणितला या संपूर्ण ‘बिग बॉस’च्या प्रवासादरम्यान प्रचंड सपोर्ट केला. त्याला जास्तीत जास्त मतं मिळावीत यासाठी प्रेक्षकांना व्होटिंग करण्याचं आवाहन देखील या कलाकारांकडून करण्यात आलं होतं. मात्र, महाअंतिम फेरीत प्रणितला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
‘बिग बॉस’मधून एलिमिनेट होणारा प्रत्येक स्पर्धक सलमानसमोर त्याचं मनोगत व्यक्त करतो. प्रणितने सुद्धा शोप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या, सर्वांचे आभार मानले. पण, यावेळी भाईजानने एक महत्त्वाचा सल्ला प्रणितला दिला. तो नेमका काय आहे जाणून घेऊयात…
सलमान प्रणितला म्हणाला, “तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस…हार्ड लक! फक्त एक गोष्ट इथून पुढे कायम लक्षात ठेव…कधीही ‘द प्रणित मोरे शो’ आता फ्री मध्ये करू नकोस” यावेळी त्याचे आई-बाबा देखील शोमध्ये उपस्थित होते.
दरम्यान, यंदा ‘बिग बॉस’ हिंदीच्या घरात प्रणित मोरे हा एकमेव मराठी स्पर्धक सहभागी झाला आहे. स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणित मोरेने अल्पावधीतच सर्वांची मनं जिंकून घेतली. सोशल मीडियावर सर्वत्र त्याची क्रेझ निर्माण झाली. त्याला चाहते ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ म्हणून देखील ओळखतात. आपला जवळचा मित्र गौरव खन्ना हा शो जिंकल्यावर प्रणित तेवढाच आनंदी झाला होता. त्याने शोमधून एक्झिट घेतल्यावर चाहत्यांनी “Unfair Eviction निदान प्रणित टॉप-२ मध्ये असायला हवा होता” अशा कमेंट्स कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या त्याच्या एव्हिक्शनच्या पोस्टवर केल्या आहेत.
