Bigg Boss 19 Nominations : टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता ७० दिवस पूर्ण झाले आहेत. ‘बिग बॉस’चा प्रवास आता हळूहळू आपल्या अंतिम टप्प्याकडे जात आहे. गेल्या आठवड्यात या शोमधून प्रणित मोरे बाहेर पडला. डेंग्यू झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र, आता अशी चर्चा आहे की प्रणित बरा झाल्यावर मेकर्स त्याला पुन्हा सिक्रेट रूममध्ये पाठवू शकतात.

प्रकृतीच्या कारणास्तव ‘बिग बॉस’च्या घरातून प्रणित बाहेर पडल्यानंतर गेल्या आठवड्यात (२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर) कोणीच एलिमिनेट झालं नाही. प्रणित घराबाहेर आल्यानंतर उरलेल्या सदस्यांमध्ये पुन्हा नॉमिनेशन टास्क झाला. यावेळी घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये बोलावण्यात आलं आणि त्यांना काही स्पर्धकांची नावं देण्यात आली, ज्यापैकी बहुमताने एकाचं नाव घेऊन त्याला नॉमिनेट करायचं होतं.

‘असा’ पार पडला नॉमिनेशन टास्क…

‘बिग बॉस १९’मध्ये या आठवड्यात मेकर्सनी घरातील सदस्यांना कन्फेशन रूममध्ये जोड्या करून बोलावलं. त्यांना ‘बिग बॉस’ने काही स्पर्धकांची नावं दिली आणि त्यातील एकाचं नाव घेऊन कारणासह त्याला नॉमिनेट करण्यास सांगितलं. या प्रक्रियेत कोणतेही आधीचे प्लॅनिंग चालणार नव्हते.

पहिल्या राऊंडमध्ये फरहाना, मालती आणि अशनूर यांना बोलावलं गेलं. त्यांना मृदुल तिवारी आणि अभिषेक बजाज यांच्यापैकी एकाचं नाव घ्यायचं होतं; तर मालती आणि फरहानाने अभिषेक बजाजचं नाव घेतलं, तर अशनूरने मृदुलला नॉमिनेट केलं. मात्र, बहुमत अभिषेकच्या विरोधात गेलं.

नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये मृदुल आणि अमाल यांना बोलावलं गेलं. त्यांना तान्या आणि फरहाना यांची नावं देण्यात आली आणि दोघांनीही फरहानाचं नाव घेतलं. मग तिसऱ्या राऊंडमध्ये कुनिका आणि नीलम यांना गौरव, अमाल आणि शहबाज यांच्या नावांपैकी एक निवडायचा होता. त्यांनी गौरव खन्नाचं नाव घेतलं. चौथ्या राऊंडमध्ये गौरव आणि अभिषेक यांना बोलावलं गेलं. त्यांना नीलम आणि मालती यांच्या नावांपैकी एकाचं नाव घ्यायचं होतं. त्यांनी नीलमला नॉमिनेट केलं. शेवटच्या पाचव्या राऊंडमध्ये तान्या आणि शहबाज यांना कुनिका आणि अशनूर यांची नावं देण्यात आली. त्यांनी अशनूर कौरचं नाव घेतलं.

या आठवड्यात ‘हे’ पाच सदस्य नॉमिनेट

नॉमिनेशन टास्कनुसार, या आठवड्यात जे सदस्य नॉमिनेट झाले आहेत ते म्हणजे – फरहाना भट, अभिषेक बजाज, अशनूर कौर, गौरव खन्ना आणि नीलम गिरी. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच जणांपैकी एकाचा प्रवास संपणार आहे. असं म्हटलं जातंय की, या आठवड्यात नीलम गिरी घरातून बाहेर होऊ शकते, कारण प्रेक्षकांना तिचा खेळ फारसा आवडत नाहीये.

दरम्यान, अनेक प्रेक्षक प्रणित मोरेला पुन्हा शोमध्ये आणण्याची मागणी करत आहेत, प्रणितचा खेळ सर्वांच्याच पसंतीस पडत होता. त्याचा स्वभाव, टास्क खेळण्याची पद्धत आणि इतर स्पर्धकांबरोबरचा बॉण्ड प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होता. मात्र, आता त्याची या घरातून एक्झिट झाली आहे, त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. प्रणितचे अनेक चाहते त्याला शोमध्ये परत आणण्यासाठी मागणी करत आहेत.