Bigg Boss Winner On Prize Money & Car :’बिग बॉस’ हिंदीचं नुकतंच झालेलं १९ वं पर्व चांगलंच गाजलं. हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा गौरव खन्ना हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. या पर्वात गौरव खन्नाबरोबर फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक व तान्या मित्तल हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. तर, अंतिम चुरस गौरव आणि फरहाना यांच्यात रंगली होती. अखेरच्या १० मिनिटांमध्ये गौरवला अधिक मतं मिळाली आणि विजेतेपदावर त्यानं आपलं नाव कोरलं.
विजेता झाल्यानंतर गौरवला ट्रॉफीसह ५० लाख रुपये मिळाले. तसेच एक गाडीसुद्धा त्याला बक्षीस म्हणून मिळाली; पण यापैकी त्याला प्रत्यक्षात अजून काहीच मिळालेलं नाहीय. त्याबद्दल स्वत: गौरवनं काही दिवसांपूर्वीच्या एका व्हिडीओत सांगितलं होतं. अशातच आता त्यानं पुन्हा एकदा ‘बिग बॉस’मधील पैसे आणि बक्षीस मिळालं नसल्याचं सांगितलं आहे.
प्राइझ मनी आणि गाडीचं काय झालं? चाहत्याचा गौरवला प्रश्न
‘बिग बॉस’नंतर गौरवनं स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केलं. या चॅनेलवर तो शूटिंगचे किस्से, परदेशात फिरायला गेल्याचे काही खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर करीत असतो. अशातच नुकत्याच एका व्हिडीओमध्ये त्यानं चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्यानं त्याला “बिग बॉसमध्ये जे गिफ्ट मिळणार होते, ते मिळाले का? जिंकलेले पैसे आणि गाडीचं काय झालं? टीव्ही मिळाला की नाही”, असे प्रश्न विचारले.
बिग बॉस मध्ये जिंकलेल्या पैशांबद्दल गौरव खन्ना म्हणाला…
चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर देताना गौरव म्हणाला, “तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की, मला काय काय मिळालंय… खरं तर या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो. खरं सांगायचं, तर मला यातलं अजून काही मिळालेलं नाही. पण मला खात्री आहे की, या सगळ्या गोष्टी मला नक्कीच मिळतील. कारण- त्यांची एक प्रक्रिया असते. काही नियम असतात. या गोष्टी मला मिळणारच नाहीत, असं होणार नाही. याला नक्कीच वेळ लागतोय; पण ठीक आहे, यात वेळ जातोच. मी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणारा मुलगा आहे. या इंडस्ट्रीत काही कामांसाठी वेळ लागतोच. त्यामुळे काही हरकत नाही. हे सगळं लवकरच मिळेल.”
या व्हिडीओमध्ये गौरवनं चाहत्यांच्या काही इतर प्रश्नांचीसुद्धा उत्तरं दिली. त्याचा पुढील प्रकल्प कोणता आहे, तो सिनेमांत दिसणार का? तसंच तो ‘अनुपमा’ मालिकेत पुन्हा परतणार का, असे अनेक प्रश्न त्याला चाहत्यांनी विचारले आणि गौरवनंही त्यावर उत्तरं दिली.
दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’नंतर ‘बिग बॉस १९’च्या ट्रॉफीवर गौरवनं आपलं नाव कोरलं. गौरव खन्नानं ‘बिग बॉस १९’ साठी प्रति एपिसोड सुमारे २.५ लाख रुपये मानधन घेतलं. तो या पर्वातला सर्वांत महागडा स्पर्धक होता.
