Bigg Boss 20 Aasif Khan Struggle Story : बिग बॉस २० ची दिमाखदार सुरुवात झाली आहे. रविवारी, ६ सप्टेंबर रोजी झालेल्या प्रिमियरमध्ये १६ सदस्यांनी घरात एंट्री घेतली. या १६ सदस्यांपैकी एक म्हणजे ‘पंचायत’ फेम अभिनेता आसिफ खान होय. सीरिजमध्ये परमेश्वर नावाची भूमिका करणाऱ्या आसिफच्या खऱ्या आयुष्याची गोष्ट चित्रपटापेक्षा कमी नाही. त्याला इंडस्ट्रीत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. एकेकाळी वेटर म्हणून काम करणाऱ्या आसिफ खानने सैफ अली खान व करीना कपूरच्या लग्नात भांडी घासली होती.

आसिफ खानचा जन्म राजस्थानमधील एका लहान गावात झाला. अभ्यासात त्याचं फारसं लक्ष लागायचं नाही, पण शाळेत नाटकात भाग घेतल्यानंतर त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्याच्या अभिनयाचे कौतुक होऊ लागलं आणि हळूहळू त्याने बाहेरही नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. आसिफचे वडील सिमेंट कंपनीत काम करायचे. त्यामुळे मुलाचं भविष्य चांगलं घडावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी आसिफला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवलं, पण अभ्यासात जेमतेम असलेला आसिफ काठावर पास व्हायचा.

वडिलांच्या निधनानंतर बदललं आयुष्य

२००८ मध्ये आसिफच्या वडिलांचं निधन झाले. त्यामुळे कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्याने त्याला इंग्रजी शाळा सोडून सरकारी शाळेत शिकायला जावं लागलं. त्या वेळी तो सातवीत होता. अभ्यासासोबतच तो कामही करू लागला. शाळेनंतर तो एअरटेलच्या ऑफिसमध्ये काम करायचा आणि पुढील काही वर्षे त्याने छोटी-मोठी कामे केली.

आईला खोटं सांगून मुंबईला पोहोचला

आसिफच्या वडिलांच्या पीएफचे काही पैसे होते. त्या पैशांमधून त्याने कॉलेजचं शिक्षण पूर्ण करावं, अशी त्याच्या आईची इच्छा होती. पण आसिफच्या मनात अभिनेता बनण्याचं स्वप्न होतं. हे स्वप्न आईला सांगितल्यावर ती काळजीत पडली. अभिनयाच्या स्वप्नापोटी तो आपलं भविष्य बरबाद करेल, अशी भीती तिला वाटत होती. मग आसिफने मुंबईला जायचं ठरवलं. इंदूरला मामाच्या घरी जातोय, असं सांगून आसिफ मुंबईत आला. नंतर आईला खरं काय ते सांगून थोडा वेळ मागितला. मुंबईत ऐनवेळी आश्रय देणाऱ्या नातेवाईकाने पाठ फिरवली, मग आसिफला एका मित्राने त्याच्या घरात राहायला जागा दिली.

आसिफला रोजच्या कामाचे मिळायचे २२५ रुपये

आसिफ मुंबईत काम शोधू लागला. त्याला वेस्टिन हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली, तिथे त्याला दररोज २२५ रुपये आणि एका वेळचे जेवण मिळायचे. तो सहा-सात जणांबरोबर एका चाळीत राहायचा. यानंतर त्याने एका मोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये साफ-सफाईचं कामही केलं.

सैफ-करीनांच्या लग्नात घासली भांडी

आपण ज्या हॉटेलमध्ये काम करतोय, तिथेच सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाचा कार्यक्रम होणार असल्याचं आसिफला समजलं. इतक्या मोठ्या कलाकारांना जवळून पाहण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळेल या आशेने तो खूप खूश होता. लग्नाला अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक दिग्गज आले होते. आसिफ किचनमधून त्यांना पाहत होता. त्याने मॅनेजरला विनंती केली की त्याला वेटरचं काम द्यावं, पण त्याने दिलं नाही.

आसिफ सांगतो की सगळे त्याच्यापासून काही अंतरावर होते, पण तो त्यांना भेटू शकला नाही. त्याला इतकं वाईट वाटलं की तो बाथरूममध्ये जाऊन खूप रडला. पोट भरण्यासाठी त्यादिवशी मन मारून काम करावं लागलं.

‘हिरो मटेरियल नाहीस’ म्हणत केलं रिजेक्ट

अभिनयात करिअर करताना आसिफला आपल्या लूकवरूनही अनेक गोष्टी ऐकाव्या लागल्या. एका ऑडिशनदरम्यान कास्टिंग कोऑर्डिनेटर शांती लाल मुखर्जी यांनी ‘तू हिरो मटेरियल नाहीस’ असं म्हणतं त्याला रिजेक्ट केलं होतं. इतकंच नाही तर तुला अभिनय येत नाही आणि पैसे देऊन लाँच करण्यासाठी तुझे वडील करोडपती नाहीत, अशा गोष्टी त्याला सुनावल्या गेल्या. पण काहींनी मात्र त्याला अभिनय शिकण्याचा सल्ला दिला. आसिफ सगळं ऐकूनही खचला नाही. थिएटर व मिळेल त्या लहान भूमिका करत राहिला आणि इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली.

‘पंचायत’ने मिळवून दिली लोकप्रियता

आसिफ खानला ‘पंचायत’ या प्राइम व्हिडीओच्या सीरिजमध्ये परमेश्वर नावाच्या जावयाची भूमिका करून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचा अभिनय आणि संवादफेक प्रेक्षकांना खूप आवडली. त्याच्या अनेक रील्स व्हायरल झाल्या आणि तो घराघरात पोहोचला. आता तो बिग बॉस २० मध्ये दिसणार आहे.

एकेकाळी ज्याने पोटाची भूक भागवायला २२५ रुपये रोजंदारीवर काम केलं होतं, बड्या कलाकारांच्या लग्नात भांडी घासली होती तो आता देशातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून आलाय. आसिफ या शोमध्ये किती पुढे जातो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.