Bigg Boss 20 Contestant Gullu Kushal Tanwar: ‘बिग बॉस २०’ चा सध्या तिसरा आठवडा सुरू असून प्रेक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, शोमधील स्पर्धक हळूहळू आपल्या मनातील गोष्टी एकमेकांशी शेअर करताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये रिअॅलिटी शो स्टार कुशल तंवर म्हणजेच सर्वांचा आवडता ‘गुल्लू’, याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा करत २०२४ मध्ये त्याचा घटस्फोट झाल्याचं स्पर्धक काझीला सांगितलं.
गुल्लू म्हणाला की, ‘रोडीज एक्सएक्स’मधून प्रसिद्धी मिळण्यापूर्वी तो आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातून जात होता. “माझं साधं ब्रेकअप झालं नव्हतं, तर मी एका मोठ्या संकटातून गेलो आहे. मला याबद्दल कोणाला सांगता येत नव्हतं, कारण प्रत्येक जण मलाच दोषी ठरवत होता. पण माझ्या स्वतःसाठी तो निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं. अखेर २०२४ मध्ये माझा घटस्फोट झाला,” असं गुल्लूने सांगितलं.
अवघ्या ५ महिन्यांत मोडलं लग्न – गुल्लू
आपल्या भागातील सामाजिक परिस्थितीबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी जिथून येतो तिथे कमी वयातच मुलांवर लग्नासाठी खूप दबाव असतो. काही करत नसलो तरी लग्न लावून दिलं जातं. माझंही एक अरेंज मॅरेज झालं होतं, पण ते अवघ्या ५ महिन्यांत मोडलं. लोक खिल्ली उडवतील किंवा मलाच दोष देतील या भीतीने मी हे कोणाला सांगितलं नाही आणि स्वतःला सगळ्यांपासून दूर करून घेतलं.”
लग्नाचा फोटो लीक झाला अन् सगळंच संपलं – गुल्लू
‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सव्हिला’सारख्या शोमध्ये लोकांचे बारीक लक्ष असते, त्यामुळे त्याने ही गोष्ट लपवून ठेवली होती. पण रोडीज संपल्यानंतर तो मित्रांसोबत गोव्याला गेला असताना, मध्यरात्री १:३० वाजता एका व्हॉट्सॲप ग्रुपवर त्याच्या लग्नाचा फोटो लीक झाला. त्यावेळी घटस्फोट झाला नव्हता, तर वाद सुरू होते. गुल्लूने लग्नाबद्दल कोणालाही सांगितलं नव्हतं. त्यामुळे तो लग्नाचा फोटो व्हायरल झाला आणि एका रात्रीत सगळं काही बिघडलं.
गुल्लूने सांगितलं की त्याच्या निर्णयामुळे कुटुंबीयही नाराज होते. त्यांनी त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडले. पण आता त्यांना त्याचा अभिमान वाटतो. दरम्यान, गुल्लूने रोडीज एक्सएक्समधून करिअरची सुरुवात केली. त्याने जून २०२५ मध्ये हा शो जिंकला. त्यानंतर यावर्षी तो ‘स्प्लिट्सव्हिला १६’चा विजेता ठरला. ‘स्प्लिट्सव्हिला १६’मध्ये तो कायरा अनूला डेट करत होता, पण काही महिन्यांनी त्यांचं ब्रेकअप झालं. तसेच गुल्लूने ‘माँ है ना’ या कॉमेडी-कुकिंग रिअॅलिटी शोचं विजेतेपदही पटकावलं.
