Bigg Boss 20 Grand Premiere Updates : टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय शो म्हणजेच ‘बिग बॉस’. या शोचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बिग बॉसमध्ये एन्ट्री मिळावी यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स उत्सुक असतात. यावर्षी हिंदी बिग बॉसचा २० वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच Bigg Boss 20 ची पहिली झलक लॉन्च करण्यात आली होती. मात्र, ग्रँड प्रीमियरची तारीख मेकर्सनी गुलदस्त्यात ठेवली होती. अखेर नुकत्याच समोर आलेल्या नव्या टीझरमधून बिग बॉसच्या २० व्या पर्वाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

२० व्या सीझनमध्ये पुन्हा एकदा होस्ट म्हणून सलमान खान स्पर्धकांची शाळा घेताना दिसेल. येत्या ६ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होईल. ६ सप्टेंबरला पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात यंदाचे स्पर्धक कोण-कोण असतील याचा उलगडा प्रेक्षकांसमोर होईल.

टीझरमध्ये सलमान खान एकदम डॅशिंग अंदाजात एन्ट्री घेतो. आणि म्हणतो, “जे करण-अर्जुनमध्ये झालं होतं…तेच आता ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा होणार तथास्तु!” ‘तथास-TWO’ ही यंदाची टॅगलाइन आहे. आता ‘करण-अर्जुन’ सिनेमात पुनर्जन्म, बदला अशी एकंदरित गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली होती. यावरूनच यंदाची थीम डिझाइन करण्यात आली आहे. लवकरच याबाबतची सविस्तर अपडेट कलर्स आणि जिओहॉटस्टारकडून शेअर करण्यात येईल.

बिग बॉसच्या २० व्या सीझनची सुरुवात ६ सप्टेंबरला होईल आणि हा शो प्रेक्षकांना जिओहॉटस्टारवर दररोज रात्री ९ वाजता आणि कलर्स हिंदी वाहिनीवर रात्री १०.३० वाजता पाहायला मिळेल.

बिग बॉसचा प्रोमो प्रदर्शित झाल्यावर सर्वत्र चर्चा सुरू होते ती, यंदा शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? यंदाही संभाव्य स्पर्धकांच्या नावांची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. जन्नात जुबैर, फैजल शेख, उर्फी जावेद, गुल्लू, रुरू ठाकूर या स्पर्धकांची नावं सध्या चर्चेत आहेत. मात्र, कलर्सने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. लवकरच कन्फर्म सहभागी स्पर्धकांची यादी प्रेक्षकांसमोर येईल.

दरम्यान, सलमान खानच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी आणि बिग बॉसच्या चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. करण-अर्जुन सिनेमाचा उल्लेख ऐकल्यावर अनेकांनी जुने स्पर्धक पुन्हा शोमध्ये येणार का? असा अंदाजही बांधला आहे. तर, अनेकांनी नवीन स्पर्धक अन् जुन्या स्पर्धकांच्या जोड्या असतील असाही अंदाज वर्तवला आहे. आता प्रत्यक्ष शोमध्ये काय घडणार याचा उलगडा ६ सप्टेंबरला ग्रँड प्रीमियरलाच होईल.