Bigg Boss 20 Salman Khan on Tathastu 2 Theme : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’कडे पाहिले जाते. सलमान खान सूत्रसंचालन करीत असलेल्या या ‘बिग बॉस’ हिंदीचा २० वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार, सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर नेहमीच आतुर असतात. लवकरच हिंदी बिग बॉसचा नवा सीझन सुरू होणार असून, त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता सलमान खानने नव्या प्रोमोमध्ये या वर्षीच्या ‘‘तथास्तु-TWO’’ या थीमचा खुलासा केला आहे.

प्रचंड लोकप्रिय आणि वादग्रस्त असलेल्या ‘Bigg Boss 20’ हा नवीन सीझन ६ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नव्या पर्वाच्या ट्रेलरमध्ये सलमानने ‘एक्स्ट्रा जीवनदान’ या अनोख्या संकल्पनेची झलक दाखवली आहे. या नव्या ट्विस्टमुळे स्पर्धकांचे प्रत्येक पाऊल, मैत्री, युती व निर्णय अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. बिग बॉस २०ची ‘तथास्तु २’ ही थीम असून, त्याचा अर्थ प्रत्येक स्पर्धकाला दोन वेळा जीवनदान मिळणार असल्याचा खुलासा सलमान खानने केला आहे.

काय आहे बिग बॉस २० हिंदीचा प्रोमो?

सलमान खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये लढाईचे जबरदस्त मैदान दाखविण्यात आले आहे. तोंडाला मास्क लावून आणि काळ्या घोड्यासह सलमान खानच्या जबरदस्त एन्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. मैदानामध्ये सलमान खान येताच दोन स्पर्धकांमध्ये धारदार शस्त्रांसह लढाई होताना दाखविण्यात आली आहे. या स्पर्धकांमध्ये जीवघेणी लढाई सुरू असताना ते एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करतात. त्यामुळे जमिनीवर आदळलेले हे स्पर्धक आता बाद झाले, असा समज होऊन सर्व प्रेक्षक नाराज होतात; पण पुढे मोठा ट्विस्ट येतो.

बिग बॉस २०ची ‘तथास्तु २’ थीम

सलमान खान स्वतः मैदानामध्ये उतरून या स्पर्धकांना जीवनदान देतो. प्रोमोमध्ये सलमान खान पुन्हा मैदानात आल्यानंतर तो एका नाही, तर दोन्ही स्पर्धकांना जीवनदान देतो आणि ही लढाई पुन्हा एकदा सुरू होते. हाच हिंदी बिग बॉसमधील या वर्षीचा मोठा ट्विस्ट असून यावेळी स्पर्धकांना दोन वेळा खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये सलमान खान म्हणतो, “यावेळी घरातील स्पर्धकांना बिग बॉस एकदा नाही, तर दोन वेळा संधी देणार आहे. त्यामुळे आता सुरक्षित राहून खेळ खेळता येणार नाही.” सलमानच्या या डायलॉगमुळे बिग बॉस हिंदी २० व्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कॅप्शनमध्येही सलमानने आता प्रत्येक स्पर्धकाला दोन वेळा जीवनदान मिळण्याचे वरदान मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक स्पर्धक बाद होऊनही पुन्हा एकदा गेममध्ये जबरदस्त पुनरागमन करणार आहे. या वर्षी हिंदी बिग बॉसची ‘तथास्तु-TWO’ अशी टॅगलाइन असणार असून, या थीमवर आधारित खेळामुळे बिग बॉसच्या घरात रंगत येणार आहे.

‘बिग बॉस 20’ हिंदी कधीपासून सुरू होणार?

दरम्यान, बिग बॉसच्या २० व्या सीझनची सुरुवात ६ सप्टेंबरला होईल आणि हा शो प्रेक्षकांना जिओहॉटस्टारवर दररोज रात्री ९ वाजता आणि कलर्स हिंदी वाहिनीवर रात्री १०.३० वाजता पाहायला मिळेल.