The 50 Show: ‘बिग बॉस’, ‘रोडीज’ आणि ‘खतरों के खिलाडी’, यांसारख्या रिअॅलिटी शोंचा गेल्या अनेक वर्षांत प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. या रिअॅलिटी शोमध्ये ‘द ५०’ या शोचा समावेश झाला आहे.
१ फेब्रुवारीला या शोचा प्रीमियर पार पडला झाला. या प्रिमिअरमध्ये शोचे भव्य स्वरूप, वेगळा फॉरमॅट पाहायला मिळाला. तसेच २ फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये काही टास्क, स्पर्धकांमध्ये भांडणे पाहायला मिळाले.
‘द ५०’ या शोची संकल्पना
विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी,यूट्यूबर्स, तसेच याआधी विविध रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेले ५० स्पर्धक सहभागी झाले आहेत. हे सर्व स्पर्धक एका मोठ्या महालात राहत आहेत. त्यांना रोज विविध टास्क दिले जातात. प्रत्येक टास्कसाठी स्पर्धकांना युती करावी लागते आणि जिंकणाऱ्या टीमकडे घरातील इतर स्पर्धकांचं भवितव्य ठरवण्याची ताकद असते.
‘बिग बॉस’ आणि ‘रोडीज’ची झलक
बिग बॉसप्रमाणेच या शोमध्येही भांडणे, मतभेद, गटबाजी पाहायला मिळते. स्पर्धकांतील संघर्ष, मतभेद हे शोचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
हा शो अधिक प्रमाणात रोडीजसारखा असल्याचे पाहायला मिळते. शोमध्ये टिकून राहण्यासाठी टास्क जिंकणे, एलिमिनेशनमध्ये वर्चस्व गाजवणे आणि स्मार्ट गेम खेळणे अत्यावश्यक आहे. एकच टास्क एखाद्या स्पर्धकाचं पूर्ण भवितव्य बदलू शकतो. तसेच रोडीजप्रमाणेच एलिमिनेशनमध्ये प्रेक्षकांचा थेट सहभाग नाही.
प्रेक्षकांची भूमिका काय?
या शोमध्ये प्रेक्षकांसाठी एक ‘बेटिंग मॉडेल’ आहे. प्रेक्षकांना आपला आवडता आणि सर्वात स्ट्रॉंग वाटणारा स्पर्धक निवडून त्याच्यावर ‘बेट’ लावता येते. जर निवडलेला स्पर्धक शो जिंकला, तर एका भाग्यवान प्रेक्षकाला ५० लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
याशिवाय सुरुवातीपासूनच छोट्या बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. पहिल्याच भागात सगळ्यात लवकर टास्क पूर्ण करणाऱ्या स्पर्धकावर बेट लावलेल्या एका प्रेक्षकाला १ लाख रुपये मिळाले.
आतापर्यंतचा सर्वात आघाडीचा स्पर्धक
प्रिन्स नरुला आघाडीच्या स्पर्धकांपैकी एक आहे. रोडीज, स्प्लिट्सव्हिला आणि बिग बॉस ९ जिंकलेला प्रिन्स सध्या रोडीजमध्ये मेंटॉरही आहे. त्याचा अनुभव, रणनीती त्याला ‘द ५०’ मध्येही उपयोगी पडत असल्याचे दिसत आहे. पहिल्याच भागात त्याने केवळ २८ सेकंदांत टास्क पूर्ण करत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रजत दलाल हाही एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे. रजत शारीरिक क्षमतेच्या टास्कमध्ये आघाडीवर आहे. जरी रणनीती त्याची कमकुवत बाजू असली तरी फैसल शेख आणि दिग्विजय राठी हे दोघेही शारिरीक आणि बौद्धिक क्षमता वापरत असल्याचे दिसत आहे.
करण पटेल आणि शिव ठाकरेदेखील लक्ष वेधून घेत आहे. आरुषी चावला, मनिषा राणी आणि निक्की तांबोळी या देखील उत्तम पद्धतीने खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘द ५०’ हा शो सध्या जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित पाहायला मिळत आहे. कलर्स टीव्हीवर हा शो रात्री १०.३० वाजता प्रदर्शित होतो.

