Anurag Dobhal Health Update : युट्यूबर आणि ‘बिग बॉस १७’ मधील एक्स स्पर्धक अनुराग डोभालचा ७ मार्च रोजी भीषण अपघात झाला. इन्स्टाग्राम लाईव्ह असताना गाझियाबादमधील दासना येथे त्याची कार डिव्हायडरवर आदळली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

या अपघातामुळे त्याची प्रकृती गंभीर होती. २ दिवसांपूर्वीच अनुरागचा मॅनेजर रोहित पांडेने त्याच्या फुफ्फुसांना दुखापत झाली असून यामुळे त्याला न्यूमोनियाचे निदान झाल्याचे सांगितले. यामुळे अनुरागचे अनेक चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. आता अनुराग थोडा बरा झाला आहे. आयसीयुमधून बाहेर आल्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वत:ची हेल्थ अपडेट दिली आहे.

“जगेन असं मला वाटलं नव्हतं” : अनुराग डोभाल

हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत अनुराग म्हणाला, “मी जगेन असं मला वाटलं नव्हतं. मी जो मार्ग निवडला, त्या मार्गावरून माघारी फिरणे माझ्यासाठी अशक्य होतं. हे सगळं काही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आता मी अनाथ आहे. आता पुढे काय होणार आहे आणि मी पुढे काय करणार आहे, हे मला माहीत नाही. पण मला आता एक नवीन आयुष्य मिळाले आहे. खूप लोकांना माझी काळजी वाटत आहे. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, मी आता बरा आहे. मी आयसीयुमधून बाहेर आलो आहे. या कठीण काळात जे जे माझ्याबरोबर होते आणि ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. कदाचित तुमच्याच प्रार्थनांनी मला हे नवीन आयुष्य मिळाले आहे. बाकी सगळं काही मी देवावर सोपवले आहे.”

भीषण अपघातानंतर अनुराग डोभालची पहिली पोस्ट

इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये अनुरागने स्वतःला एकटं वाटत असल्याचं आणि मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली असल्याचं सांगितलं. नंतर त्याने अचानक कारचा वेग वाढवला आणि काही क्षणांतच कारचा वेग ताशी सुमारे १५० किलोमीटरपर्यंत गेला. वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याचा अपघात झाला.

इन्स्टाग्रामवरील लाईव्हमध्ये अनुरागने भावुक होत “आई, पुढच्या जन्मात आलो तर मला फक्त प्रेम दे. मला प्रेमाची खूप गरज होती. आता फोन करायला कुणीही उरलेलं नाही”, असं म्हटलं होतं. यानंतर जवळपास अर्धा तास तो आपल्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत राहिला. शेवटी ‘लेट्स गो फॉर द फायनल ड्राइव्ह’, असे म्हणत त्याने कार वेगात चालवली आणि काही वेळातच त्याचा अपघात झाला.