UK07 रायडर म्हणून ओळखला जाणारा, बिग बॉस 17 फेम अनुराग डोभाल त्याच्या ताज्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अनुरागने यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करून आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच पत्नी रितिका सोडून गेल्याचंही त्याने व्हिडीओत सांगितलं. अनुरागने त्याच्या यूट्यूब चॅनलवर २ तासांहून मोठा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने ढसाढसा रडत कुटुंबीय त्रास देत असल्याचं नमूद केलं.

अनुरागने सांगितलं की, कदाचित हा त्याचा शेवटचा व्हिडीओ असेल आणि यानंतर तो गायब होईल. त्याने आपल्या कुटुंबावर छळाचा आरोप केला आहे. अनुरागने म्हटलं की तो १४ वर्षांचा असताना त्याला ब्रेन ट्यूमर झाला होता, पण त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आणि करिअर घडवण्यासाठी मेहनत घेतली.

अनुराग डोभालने आई-वडिलांवर केले आरोप

अनुरागच्या मते, त्याने नेहमीच स्वतःच्या गरजांपेक्षा आपल्या आई-वडिलांच्या गरजांना महत्त्व दिले, पण शेवटी त्यांनीच त्याला मानसिक त्रास दिला. सोशल मीडियावर दिसणारी दुनिया खोटी आहे. त्याचे आई-वडील वरवर प्रेमळ आणि आधार देणारे वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे नाहीत. त्याच्या आई-वडिलांचा त्याच्या आंतरजातीय लग्नाला विरोध होता, असा आरोप अनुरागने केला.

Award Banner

आंतरजातीय लग्नाला कुटुंबाचा विरोध

अनुराग डोभालने खुलासा केला की, त्याची पत्नी रितिका ही त्याची चाहती होती आणि ती दोन-तीन वर्षांपासून त्याला मेसेज करत होती. त्याने तिला रिप्लाय दिला आणि बोलणं सुरू झाल्यावर ते एकमेकांना डेट करू लागले. मग त्याने लग्न करायचं ठरवलं. त्याने आई-वडिलांची आंतरजातीय लग्नासाठी मनधरणी केली, पण लग्नाच्या अवघ्या ५ दिवस आधी त्यांनी लग्नाला येण्यास नकार दिला. “आम्ही लग्नाला आलो तरी खूश नसू,” असं अनुराग डोभाल म्हणाला.

नैराश्यात आहे अनुराग डोभाल

अनुरागच्या लग्नात त्याचे आई-वडील आले नव्हते आणि सर्व तयारी त्याने स्वतःच केली होती. तो भावूक होत म्हणाला, “माझ्या मृत्यूला माझे आई, बाबा, भाऊ (कलाम) आणि श्रेया जबाबदार असतील. माझ्याकडे आता करण्यासाठी काहीच उरलेलं नाही. मी प्रचंड नैराश्यात आहे. मला नैराश्यातून कसं बाहेर यावं कळत नाहीये. या व्हिडीओनंतर कदाचित मी गायब होईन. मला फक्त झोपायचं आहे. गेल्या ५ दिवसांपासून मी काहीही खाल्लेलं नाही, माझे डोकं बधीर झालंय.”

पत्नी अनुरागला सोडून गेली

अनुराग डोभाल दावा केला की, त्याच्या कुटुंबाने त्याची सर्व मालमत्ता बळकावली आहे. इतरांच्या सांगण्यावरून पत्नीही सोडून निघून गेली आहे. अनुराग म्हणाला, “मी गेल्यानंतर श्रेया, मम्मी आणि पप्पा बऱ्याच गोष्टी बोलतील आणि खोटं बोलतील पण मी चुकीचा नव्हतो. रितिका, अनेक लोक तुला भडकवतील आणि खोटं सांगतील, मात्र मी तुझ्यावर नेहमीच प्रेम केलंय आणि सगळं तुझ्यासाठीच केलंय.”

अनुराग डोभाल पत्नीला म्हणाला…

“तू इतरांवर विश्वास न ठेवता माझ्यावर विश्वास ठेवला असतास आणि माझ्या पाठीशी उभी राहिली असतीस, तर बरं झालं असतं. खोटारड्या लोकांनी तुला भडकावलं. माझ्या जाण्यानंतर किमान माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी तरी बोल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं बोल. मी तुला कधीच चुकीचं ठरवलं नाही, पण माझ्या जाण्यानंतर प्लीज स्वाभिमानासाठी लढ,” असं अनुराग डोभाल पत्नीला उद्देशून म्हणाला.

अनुरागने युट्यूब व्हिडीओत त्याच्या कुटुंबाचे ऑडिओ व व्हॉट्सअॅप मेसेज शेअर केले आहेत. भावाने धमकी दिल्याचाही उल्लेख त्याने केला आहे.