‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे अभिनेते किरण माने घराघरांत लोकप्रिय झाले. सोशल मीडियावर ते नेहमीच सामाजिक व राजकीय विषयांवर त्यांची स्पष्ट मतं मांडत असतात. सध्या त्यांच्या राजकीय पक्षप्रवेशाची सर्वत्र चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय किरण मानेंनी का घेतला? याविषयी नुकत्याच ‘अजब गजब’ला या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारणात प्रवेश करण्यासाठी ही योग्य वेळ का वाटली आणि पक्षप्रवेशासाठी सत्ताधाऱ्यांची निवड न करता उद्धव ठाकरेंना पाठिंबा का दिला? याविषयी सांगताना किरण माने म्हणाले, “सध्या अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे. आपण सोशल मीडियावर एखादी पोस्ट करतो आणि आपले हजारो मित्र तू असं सरकारविरोधी बोलू नकोस असं सांगायला येतात. खरं सांगायचं झालं, तर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं हे आपलं काम आहे. प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य देखील आहे. पण, आता सत्ताधाऱ्यांना कोणीच काही बोलायचं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतेच सत्ताधारी परफेक्ट नसतात आपण त्यांना त्या दिशेने घेऊन जायचं असतं. जनता एखाद्या गोष्टीवर नाखूश असेल, तर सत्ताधाऱ्यांवर दबाव आला पाहिजे. पण, आता हे होतंच नाहीये.”

हेही वाचा : अंकिता लोखंडेसाठी ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली अमृता खानविलकर! लाडक्या मैत्रिणीला पाहून अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

किरण माने पुढे म्हणाले, “आता लोक विरोध करण्यास घाबरू लागले आहेत. मी स्वत: समाजकारणातून आता राजकारणाकडे वळलो आहे. जेव्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पक्ष कोणता निवडायचा? हा प्रश्न डोळ्यासमोर होता. मला कोणत्याही पदाची, पैशांची कोणतीही लालसा नव्हती. दोन नंबरचा पैसा माझ्या घरात कधीच आलेला नाही आणि तसा पैसा मला नकोच आहे. मला फक्त माझं काम प्रामाणिकपणे करायचं होतं. आजच्या घडीला सत्ताधाऱ्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून आरोप लावले अशा लोकांनाच त्यांनी पक्षात घेतलंय. सध्या या राजकीय भ्रष्टाचाराचा सगळ्यात जास्त तोटा उद्धवजी ठाकरेंना झाला आहे याची जाणीव मला होती. त्यांचा संपूर्ण पक्ष फोडला गेला. सगळ्या जनतेने काय झालंय ते पाहिलंय. ईडीची धाड पडल्यावर आठ ते दहा दिवसांनी लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश अन् पाठिंबा घेण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या पक्षावर न्यायाच्या नावाने अन्याय झाला. लोकांना आता सर्व कळतंय. बेकायदेशीरित्या सगळं सुरू आहे.”

हेही वाचा : श्रेयस तळपदे : एकेकाळी पैशांची अडचण ते आज कोट्यवधींचा मालक, पडद्यामागच्या ‘पुष्पा’चा ‘असा’ आहे प्रवास

“उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे जाणं मला जास्त सोयीस्कर वाटलं कारण, ठाकरे परिवार…त्यांच्या घरात कलाकारांना खूप सन्मान आहे. घरात राजकारणासह कलेचा वारसा आहे. त्यामुळे मला आणि एका कलाकाराच्या भावनेला ते समजून घेऊ शकतील याची मला खात्री होती. उद्धव ठाकरे खरंच खूप शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. राजकारणात सध्या जी चिखलफेक सुरू आहे त्यात सगळ्यात जास्त संयमी उद्धव ठाकरे आहेत. ज्यावेळी सगळे साथीदार सोडून गेले तेव्हा त्यांनी लगेच वर्षा बंगला सोडला. याला खूप मोठं धाडस लागतं. माणसं सत्ता सोडताना खूप आकांडतांडव करतात. पण, त्यांनी लगेच सोडली…ती गोष्ट मला खूप आवडली होती. त्यामुळेच मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.” असं किरण मानेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame kiran mane reveals why he chose uddhav thackeray group to enters in politics sva 00
First published on: 27-01-2024 at 12:23 IST