kunickaa sadanand comment on Pranit More Apology Video : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने ‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरणावर माफी मागितली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून त्याची चूक झाल्याची कबुली दिली आहे. ‘मी त्या मुलाला थांबवू शकलो असतो, पण थांबवलं नाही, स्टँड घेतला नाही,’ असं म्हणत प्रणित मोरेने सर्वांची माफी मागितली आहे. प्रणित मोरेने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केल्यावर त्यावर सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत.

प्रणित मोरेच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री किश्वर मर्चंटने “मला विश्वास आहे की लोक तुला माफ करतील, मात्र पुढच्या वेळी शोमध्ये बोलताना काळजी घे,” अशी कमेंट केली आहे. ‘माणूस चुकांमधूनच शिकतो,’ ‘हिंमत हारू नकोस, काही दिवसांनी लोक विसरून जातील मात्र पुन्हा अशा चुका करू नकोस,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या मानसिकतेचं मूळ तू नाहीस – कुनिका सदानंद

प्रणित मोरेबरोबर बिग बॉस १९ मध्ये राहिलेल्या कुनिका सदानंदच्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे. “चुका प्रत्येकाकडूनच होतात, पण त्या स्वीकारण्याचं धाडस सर्वांकडे नसतं. प्रणित तू एक चांगला मुलगा आहेस आणि तुझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. पण मी तुला नेहमी सांगायचे त्याप्रमाणे, जेव्हा लोक प्रतिसाद देतात आणि हसतात, तेव्हा एक कलाकार म्हणून रोस्टिंग किंवा क्राउड वर्कमध्ये वाहवत जाण्याची शक्यता असते.

kunickaa sadanand comment on Pranit More Apology Video
प्रणित मोरेच्या माफीच्या व्हिडीओवर अभिनेत्री कुनिका सदानंदची कमेंट

मला आशा आहे की लोक तुला माफ करतील आणि लोकांचा महिलांकडे/मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशीही आशा मी बाळगते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या मानसिकतेचं मूळ तू नाहीस, तर महिलांना वस्तू समजण्याच्या या जुन्या विचारसरणीचा वारसा मिळालेल्या अनेक लोकांपैकी तू एक आहेस. मला विश्वास आहे की तू पुन्हा एकदा उत्तम कंटेंट घेऊन परत येशील. हिंमत ठेव आणि विचापूर्वक बोल,” अशी कमेंट कुनिका सदानंदने केली आहे.

दरम्यान, हिंमाशू जांगरा व सेजल पवार प्रणित मोरेच्या शोमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. ‘तिच्याकडून ३७० रुपयांची बिर्याणी वसूल करायची होती,’ असं म्हणत लैंगिक संबंधांची अपेक्षा ठेवत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हिमांशूला कंपनीने कामावरून काढून टाकलंय. दुसरीकडे, मुंबईतील केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. सेजल पवार हिच्यासंदर्भातही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रणित मोरे, सेजल पवार व हिमांशू जांगरा या तिघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.