‘बिग बॉस मल्याळम’ फेम अभिनेत्री गायत्री सुरेशने धक्कादायक खुलासा केला आहे. एका टास्कदरम्यान बिग बॉसने तिला विचारलं, “तुम्हाला आयुष्यात ज्या व्यक्तीने सर्वात जास्त दुखावले आहे त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली, तर तुम्ही काय सांगाल?” त्यावर गायत्रीने तिच्या एका ‘सिच्युएशनशिप’बद्दल सांगितलं. त्या नात्याचा तिच्यावर खूप परिणाम झाला, असं तिने स्पष्ट केलं.

“मला आतापर्यंत अनेक लोकांनी दुखावलं आहे, पण ज्या घटनेने मला सर्वात जास्त दुखावलं, किंवा असे म्हणा की ज्या घटनेने मला सर्वात मोठा मानसिक धक्का दिला, ती २०२१ मध्ये घडली होती. तेव्हा मी एका सिच्युएशनशिपमध्ये होते. मला वाटलं की ते एक खरं नातं आहे, पण आता मागे वळून पाहताना मला वाटतं की ती फक्त एक सिच्युएशनशिप होती,” असं गायत्री म्हणाली.

त्याने विचारलं, तुला एड्स आहे का? गायत्री सुरेश

तो चुकीचा वागत होता तरी त्याला सुधारण्याची अनेकदा संधी दिली, असं तिने सांगितलं. “माझा स्वभाव असा आहे की मला लोकांमधील रेड फ्लॅग्स (चुकीच्या गोष्टी) लगेच लक्षात येतात. तरीही मी लोकांना तीन संधी देते आणि तरीही ते न सुधारल्यास मी त्यांना आयुष्यातून काढून टाकते. आमच्या नात्याच्या पहिल्याच आठवड्यात त्याने मला विचारलं की मला एड्स आहे का? त्याच क्षणी मी त्याच्याबरोबरचं नातं संपवलं होतं,” असं ती म्हणाली.

त्याला संधी दिली, त्याने फसवणूक केली – गायत्री सुरेश

“पण नंतर, आपणच जास्त नकारात्मक विचार तर करत नाही ना, किंवा प्रत्येक गोष्टीत फक्त चुकाच शोधत नाही ना, असा विचार मनात येतो. म्हणूनच मी त्या नात्याला संधी दिली. नंतर मला समजले की तो दुसऱ्या एका मुलीसोबतही नात्यात होता. मी त्रिशूरमध्ये राहते आणि तो एर्नाकुलममध्ये राहायचा, तिथे तो दुसऱ्या एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता,” असा खुलासा गायत्रीने केला.

पुढे ती म्हणाली, “त्या काळात मी फार वाईट परिस्थितीतून जात होते. हो, माझ्यामध्येही अनेक वाईट गुण आहेत, त्यामुळे मी स्वतःला परफेक्ट म्हणणार नाही. पण माझं मन स्वच्छ आहे आणि मी कोणालाही दुखावत नाही. त्यानंतर तो माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला. एक दिवस मी त्याला ठामपणे सांगितलं की मला तुला भेटायचंय. तो आला आणि आम्ही दोघे कारमध्ये एकत्र असतानाच अपघात झाला.”

अपघात आणि व्हायरल व्हिडीओंबद्दल गायत्री म्हणाली…

ऑक्टोबर २०२१ मध्ये गायत्री सुरेश त्याच्याबरोबर असतना अपघात झाला. अपघातानंतर लगेच गाडी थांबवण्याऐवजी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या वाहनातील लोकांनी पाठलाग करून त्यांना अडवलं. पाहता पाहता तिथे गर्दी जमली, वाद वाढला आणि या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. गायत्री म्हणाली, “अपघातानंतर पोलीस आले आणि त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथून परत आल्यावर तो मला एका कॅफेमध्ये एकटं सोडून त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटायला निघून गेला. त्या गोष्टीचा मला मोठा मानसिक धक्का बसला.”

ती पुढे म्हणाली, “त्यामुळे आज जर मी त्याला पुन्हा भेटले, तर मी त्याचे आभार मानेन. त्याच्या त्या दुसऱ्या गर्लफ्रेंडला काय काय सहन करावे लागले असेल याची मला कल्पनाही करवत नाही. कारण तो अत्यंत स्वार्थी आणि मानसिक छळ करणारा होता. म्हणूनच जर मी त्याला आता भेटले, तर मी म्हणेन, ‘दुसऱ्या मुलीच्या मागे निघून गेल्याबद्दल तुझे आभार.’ नाहीतर मलाच त्या नात्यात आयुष्यभर त्रास सहन करावा लागला असता. या घटनेमुळे मी अधिक खंबीर झाले आणि स्वतःला बदलून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.”