Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वात सहभागी झालेले स्पर्धक सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येताना दिसतात. आता या पर्वात ज्या सदस्यांचा खेळ प्रेक्षकांना आवडत आहे, तो सदस्य म्हणजे अभिषेक सावंत हा आहे. प्रेक्षकांपासून ते शोचा होस्ट रितेश देशमुखपर्यंत सगळे जण त्याच्या खेळाचे कौतुक करताना दिसत आहेत. आता अभिजीत सावंतने एका मुलाखतीमध्ये इंडियन आयडलनंतर त्याच्या करिअरचा प्रवास कसा होता, याबद्दल वक्तव्य केले होते; ते सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाला अभिजीत सावंत?
अभिजीत सावंतने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने आपल्या करिअरमधील संघर्षाबद्दल बोलताना म्हटले, “जेव्हा मी इंडियन आयडलचा विजेता झालो, त्यावेळी प्रेक्षकांना माझ्याबद्दल आपुलकी वाटत होती. आपल्यातीलच कोणीतरी जिंकला आहे, अशी त्यांची भावना होती. मात्र, इंडस्ट्रीमधील लोकांना वाटायचे हे तर चुकीचे झाले, आम्ही इतके दिवस कष्ट करत आहोत पण हा जिंकला, त्यांच्यामध्ये मत्सराची भावना होती, हा माणसाचा स्वभावच आहे. अशावेळी तुम्हाला पाठिंबा मिळणे गरजेचे असते. तुम्हाला एक आधार असला पाहिजे. तुम्हाला लोकांना हे पटवून देता आले पाहिजे की, तुम्ही आधी जसे होता तसेच आहात.”
पुढे बोलताना अभिजीतने म्हटले, “एकदा मी असा प्रयत्नदेखील केला होता. एका म्युझिक डायरेक्टरला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये बाहेर बसलो होतो, जसे इंडियन आयडलच्या आधी काम मिळवण्यासाठी मित्रांबरोबर बसायचो. पण, त्यावेळी त्या म्युझिक डायरेक्टरने मला बघण्याआधी इतर लोकच माझ्या सभोवती गोळा झाले. इतकी गर्दी का झाली आहे हे बघण्यासाठी तो म्युझिक डायरेक्टर बाहेर आला”, अशी आठवण अभिजीत सावंतने या मुलाखतीदरम्यान सांगितली आहे.
याबरोबरच, “इंडियन आयडलनंतर सात-आठ वर्षे खूप चांगली गेली. मला वेळ नसायचा इतकी कामं होती. मात्र, त्यानंतर असं झालं की तुमची कारकीर्द छोटीआहे, पण त्याची प्रतिमा खूप मोठी झाली आहे. ती झेलणं खूप अवघड आहे. त्या सगळ्यांना असं वाटायचं की याला गर्व असेल, याच्या डोक्यात हवा गेली असेल, पण लोकांनी मला विचारले नाही. या सगळ्यात समतोल साधणे खूप महत्त्वाचे होते. त्यामध्ये खूप वर्षे गेली आणि तो मोठा संघर्ष होता”, असे अभिजीत सावंतने म्हटले आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुखने अभिजीत सावंतच्या खेळाचे कौतुक केले. घरातील कोणत्याही व्यक्तीचा प्रभाव स्वत:वर पडू न देता, स्वत:ची प्रतिष्ठा राखत खेळ खेळल्याचे रितेश देशमुखने म्हटले आहे. आता पुढील खेळात अभिजीत सावंतची वाटचाल कशी असणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.