Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाची चांगलीच चर्चा सुरू आहे. निक्की आणि आर्यामधील वाद याला कारण ठरला आहे. आर्याने निक्कीला कानशिलात लगावल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाऊच्या धक्क्यावर त्याचा निर्णय होणार आहे. मात्र, आता पंढरीनाथ कांबळे आणि बी टीममधील इतर सदस्यांची चर्चा रंगली आहे.
भाऊच्या धक्क्यावर दर आठवड्याला एका सदस्याला चक्रव्यूह रूममध्ये बोलवले जाते आणि त्याला कोणते स्पर्धक त्याच्या पाठीमागे काय बोलले याचे व्हिडीओ दाखवले जातात. आता या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यावर पंढरीनाथ कांबळेला या रुममध्ये बोलवले होते. त्यावेळी पंढरीनाथ कांबळेने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.
“त्यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीत स्वार्थ बघितला असेल”
‘कलर्स मराठी’ वाहिनीने एक प्रोमो शेअर केली आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रितेश देशमुख पंढरीनाथला म्हणतो, “पॅडी भाऊ या चक्रव्यूह रुममध्ये या.” त्यानंतर पंढरीनाथ चक्रव्यूह रुममध्ये जातो आणि तिथे गेल्यावर त्याला काही व्हिडीओ दाखवले जातात, ज्यामध्ये त्याच्याबद्दल बोलले गेले आहे. त्यामध्ये धनंजय आणि अंकिता दिसत आहेत. हे पाहिल्यानंतर पंढरीनाथ म्हणतो, “त्यांनी कदाचित प्रत्येक गोष्टीत स्वार्थ बघितला असेल, घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना समजेल की त्यांनी केलेली विधाने चुकीची होती. पॅडीने कधीच कुठली गोष्ट स्वार्थीपणे केली नाही, त्याच्यामध्ये नि:स्वार्थ भावना असते.” त्यानंतर तो बाहेर येतो आणि थँक्यू थँक्यू असे म्हणताना दिसत आहे. त्यानंतर अंकिता आणि धनंजय यांचे चेहरे पडलेले दिसत आहेत.
यामुळे टीम बीमध्ये फूट पडणार का? पंढरीनाथ, अंकिता व धनंजय यांच्यातील नाते यापुढे कसे असेल; याबरोबरच यानंतर घरातील समीकरणे बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, प्रेक्षक भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण या एपिसोडमध्ये आठवडाभरात सदस्यांनी केलेल्या चुका, टास्कमध्ये दाखवलेला खेळ, वाद-भांडण आणि काही चांगल्या गोष्टींबाबत त्यांना रितेश देशमुखकडून आरसा दाखवला जातो. चुकलेल्या स्पर्धकांची शाळा घेतली जाते आणि चांगले खेळणाऱ्यांना शाबासकी मिळते. आता याआधी समोर आलेल्या प्रोमोमध्ये आर्या आणि संग्रामची कडक शब्दांत कानउघाडणी केल्याचे पाहायला मिळाले. भाऊच्या धक्क्यावर आणखी काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.