‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील पहिला आठवडा पूर्ण होत असून, या आठवड्यात अनेक गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले आहे. बिग बॉसच्या या पर्वाचे सूत्रसंचालन करीत असलेल्या रितेश देखमुख यांनी शनिवारी पार पडलेल्या ‘भाऊचा धक्का’ या एपिसोडमध्ये सर्व स्पर्धकांना ते खेळत असलेल्या खेळातील त्यांच्या चुका आपल्या खास अंदाजात सांगितल्या होत्या. निक्की तांबोळीला मराठी माणसाच्या मानसिकतेवर वक्तव्य केल्याबद्दल कडक शब्दांत समज देण्यात आल्याचे शनिवारी प्रदर्शित झालेल्या भागात पाहायला मिळाले. आता ‘कलर्स मराठी’ने रविवारच्या भागाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘कलर्स मराठी’ने बिग बॉसच्या रविवारी म्हणजेच आज संध्याकाळी प्रदर्शित होणाऱ्या भागाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हि़डीओमध्ये आज बिग बॉसच्या घरात फ्रेंडशिप डे साजरा होणार असल्याचे दिसत आहे. रितेश देखमुख घरातील सदस्यांना सांगतात की, आज फ्रेंडशिप डे आहे आणि हा दिवस आपण ‘फ्रेंडशिप डे’चे लॉकेट देऊन साजरा करणार आहोत. सगळे जण एकमेकांना ते लॉकेट देत असल्याचे दिसत आहे. मात्र, कोणत्या स्पर्धकाने कोणत्या स्पर्धकाला काय लिहिलेले लॉकेट दिले, हे स्पष्टपणे दिसत नाही.

काय म्हणाला घनश्याम?

शेवटी योगिता चव्हाण येते आणि ती म्हणते की, डबल ढोलकी मित्र असलेले हे लॉकेट आहे. ते मला घनश्याम यांना द्यायचे आहे. घनश्यामचे नाव घेतल्यावर तो, ग्रुपची ताकद किती असते बघितलं?, असे म्हणतो. त्यावर योगिता, “मला बोलू द्या”, असे म्हणत आहे. तिच्या या वाक्यानंतर घनश्याम लगेच आठ दिवस बोलली नाही; आता बोलायचं आहे, बोल. असे म्हणताना दिसत आहे.

आता बिग बॉसच्या आजच्या भागाची ही झलक सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रेक्षक आजचा ‘भाऊचा धक्का’ एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहेत. सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या आजच्या भागाची झलक शेअर करताना कलर्स मराठीने, “रितेश भाऊच्या धक्क्यावर साजरा करणार फ्रेंडशिप डे, जुळणार नव्या मैत्रीची नवीन समीकरणं”, अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा: Kishore Kumar Birthday: किशोर कुमार नावाच्या मनमनांत वाहणाऱ्या आनंदमयी झऱ्याची गोष्ट!

दरम्यान, ‘बिग बॉस’च्या या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच भांडणे, वाद होताना दिसत आहेत. अनेकांचे गट व्हायलादेखील सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने कोणता स्पर्धक कोणत्या सदस्याविषयी काय विचार करतो, हे प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याबरोबरच या घरात बदलणाऱ्या समीकरणाबरोबर सदस्यांची मैत्री टिकणार का?हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.