Bigg Boss चा शो असा आहे, ज्यामध्ये कधी कोणत्या गोष्टी घडतील हे कोणीही सांगू शकत नाही. घरातील स्पर्धकांमधील समीकरणे कोणत्या गोष्टींवरून बदलतील याचा अंदाजदेखील लावता येत नाही. आता बिग बॉस मराठीच्या घरात असेच चित्र दिसत आहे. धनंजय पोवार त्याच्या टीमवर नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय पोवारची ग्रुप बीवर नाराजी 'कलर्स मराठी' वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. गार्डन परिसरात धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकरमध्ये संवाद सुरू आहे. यावेळी धनंजय पोवार अंकिताला, "अति बोलल्यामुळे किंमत शून्य झालीय, एवढंच आहे. माझ्या एकापण प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही कधी ग्रुपमध्ये", असे म्हणतो. त्यावर अंकिता त्यांना विचारते, "तुम्हाला असं सोडायचं आहे सगळ्यांना?" तिच्या या प्रश्नावर, धनंजय 'हो' म्हणताना दिसत आहे. त्यानंतर अंकिता आणि पंढरीनाथ एकत्र बसले असून ते धनंजयबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. पंढरीनाथ म्हणतो, "…म्हणजे ग्रुपवर अविश्वास दाखवत आहे, काय चुकलंय?" त्यावर अंकिता म्हणते, "जे पण ते वाटून घेत आहेत, ते चुकीचे आहे आणि त्यामुळे ते समीकरणे बदलतील." कलर्स मराठी इन्स्टाग्राम हा प्रोमो शेअर करताना 'कलर्स मराठी वाहिनी'ने असे म्हटले आहे, "डीपीची नाराजी बदलणार का टीम बीच्या खेळाची समीकरणे?" वर्षाताईंनी धनंजय पोवारला नॉमिनेट केल्यामुळे आणि अंकिताने निक्कीची जेवण बनवण्यात मदत करण्याचा निर्णय घेतल्याने धनंजय त्याच्या ग्रुपवर नाराज आहे. आता पुढील खेळात स्पर्धकांची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तो बी टीममधून स्वत:ला बाजूला करणार का, अंकिताबरोबर त्याचे काय समीकरण असणार, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. हेही वाचा: सई लोकूरने पहिल्यांदाच दाखवला लाडक्या लेकीचा चेहरा! फोटो शेअर करत म्हणाली, “आज आई म्हणून…” गेल्या आठवड्यात ए टीममध्ये फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. एकमेकींना मैत्रिणी म्हणवणाऱ्या निक्की आणि जान्हवी यांच्यामध्ये मोठे भांडण झाल्याचे दिसले होते. आता बी टीममध्येदेखील फूट पडणार का आणि त्यामुळे बी टीमची समीकरणे बदलणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात घरात दोन गट पडले होते. मात्र, जसजसा खेळ पुढे जाईल तसतसे सदस्यांमध्ये मतभेद होत असून त्यांच्या टीममध्ये भांडण होत असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. आता घरात आणखी कोणता कल्ला होणार, कॅप्टन्सी टास्क जिंकून कोणता स्पर्धक घराचा नवीन कॅप्टन होणार, या आठवड्याच्या शेवटी कोणत्या स्पर्धकांची शाळा घेतली जाणार, कोणत्या स्पर्धकांना शाबासकी मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.