Bigg Boss Marathi 5 चे पर्व सतत चर्चेत आहे. या आठवड्यात घरातील स्पर्धकांमधील समीकरणे पुन्हा एकदा बदलल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसने घरातील स्पर्धकांना नुकताच एक टास्क दिला होता. या टास्कचे नाव बीबी फार्म असे होते. या टास्कदरम्यान सदस्यांमध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळते. आता या सर्व वादविवादामध्ये सूरज आणि पंढरीनाथ कांबळेचा एक मजेशीर प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये एक मजेशीर संवाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रोमोच्या सुरुवातीला सूरज चव्हाण आणि पंढरीनाथ कांबळे गार्डन परिसरात एका सोफ्यावर बसले आहेत. वर्षाताई सूरजला जेवायला बोलवतात. त्यानंतर पंढरीनाथ कांबळे त्यांना हसत एक टास्क आहे असे म्हणतो. त्यावर वर्षाताई पंढरीनाथ कांबळेला म्हणतात, "अरे पंढरी, जमलं तर माफ कर रे"; त्यावर पंढरीनाथ कांबळे हसत म्हणतो, "वाईट वाटतं हो ताई, तुम्ही फक्त सूरजला हाक मारता." त्यावर सूरज म्हणतो, "का जळता माझ्यावर", पंढरीनाथ म्हणतो, "जा आता माझी जळजळ कमी होईल." सूरज म्हणतो, "जळू नका करपाल, तोंड करपेल", त्यावर पंढरीनाथ आणि शेजारच्या सोफ्यावर बसलेला अभिजीत हसताना दिसत आहे. कलर्स मराठी काय म्हणाले नेटकरी? पंढरीनाथ कांबळे आणि सूरज चव्हाण यांची मैत्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, "पॅडीदादा आणि सूरज यांचं नातं बेस्ट आहे." दुसरा नेटकरी म्हणतो, "सूरजभाऊ आणि पॅडीदादा यांची केमिस्ट्री भारी आहे." आणखी एक नेटकरी म्हणतो, "सूरज आणि पॅडीदादा नंबर एक जोडी", असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. हेही वाचा: “मी अमिताभ बच्चन नावाच्या वादळाचा…”, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी सांगितलेली ‘ती’ आठवण दरम्यान, बिग बॉसच्या घरात या आठवड्यात काय होणार, आणखी कोणता कल्ला होणार, घरामधील समीकऱणे पुन्हा बदलणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याबरोबरच, घराबाहेर जाण्यासाठी अभिजीत सावंत, आर्या जाधव, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, घन:श्याम दरवडे हे स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. आता आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर कोणत्या स्पर्धकांची शाळा घेतली जाणार आणि कोणत्या सदस्यांना शाबासकीची थाप मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.