'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व पहिल्या दिवसापासूनच गाजताना दिसत आहेत. आता बिग बॉस (Bigg Boss Marathi)च्या घरात दोन गट पडल्याचेही पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये कॅप्टन होण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. या सगळ्यात घन:श्याम म्हणजेच छोटा पुढारी आपल्या वेगळ्या अंदाजाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असताना दिसतो. मात्र, आता 'कलर्स मराठी'ने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घन:श्याम भावूक झाल्याचे दिसत आहे. घन:श्याम का झाला भावुक? 'कलर्स मराठी'ने 'बिग बॉस'मधील एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये घन:श्याम आणि धनंजय पोवार एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. धनंजय पोवारबरोबर बोलताना घन:श्यामने माझ्या कमी उंचीमुळे लोक मला आणि माझ्या घरच्यांना वाईट बोलायचे, नावे ठेवायचे, अशी आठवण सांगितली आहे. तो म्हणतो, "लोक माझ्या आई-वडिलांना म्हणायचे, तुमच्या मुलाची उंची नाही. तुमचा मुलगा काही करू शकत नाही. आता तीच माणसं म्हणत असतील, यांचा मुलगा कसा 'बिग बॉस'मध्ये गेला आहे", हे सांगताना तो रडत आहे. त्याच्या बोलण्यावर, "ज्याला शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय मापता येणार?", असे म्हणत धनंजय पोवार त्याला धीर देताना दिसत आहेत. कलर्स मराठी इन्स्टाग्राम 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्या आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी घराचा निरोप घेतला. या आठवड्यात बिग बॉसने 'कॅप्टनसी'साठी बुलेट ट्रेनचा टास्क घेतल्याचे पाहायला मिळाले. आता 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वाची पहिली कॅप्टन कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर झाली आहे. ती कॅप्टन झाल्यानंतर आर्या, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार, निखिल दामले, आर्या जाधव, पंढरीनाथ कांबळे, अभिजित यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हेही वाचा: Bigg Boss Marathi : “लायकी, भीक अशी घाणेरडी भाषा…”, योगिताच्या नवऱ्याची खरमरीत पोस्ट; म्हणाला… त्याबरोबरच बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांवर टीका होताना दिसत आहे. जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, अरबाज पटेल हे कलाकार ज्या पद्धतीने इतर स्पर्धकांशी बोलतात, त्यावर कलाविश्वातील अनेकांनी आक्षेप घेतला आहे. प्रसिद्ध निर्माते संदीप सिकंद यांनी पोस्ट शेअर करीत “अरबाज पटेल, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर हे लोक ‘बिग बॉस मराठी’च्या घरातले गुंड आहेत", असे म्हणत आपला राग व्यक्त केला आहे. आता या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर कोणत्या स्पर्धकाचे कौतुक होणार, कोणत्या स्पर्धकाची शाळा घेतली जाणार आणि कोणता स्पर्धक दुसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घराला निरोप देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.'