Bigg Boss Marathi 5 वे पर्व विविध कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी घडल्याचे पाहायला मिळाले. निक्की आणि आर्यामध्ये झालेल्या भांडणात आर्याने निक्कीला कानशिलात लगावली होती. त्यानंतर आर्याला भाऊच्या धक्क्यावर घराबाहेर जाण्याची शिक्षा मिळाली. त्याबरोबरच वैभव चव्हाणलादेखील कमी मते मिळाल्यामुळे बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरात जंगलराज असणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे.
‘या आठवड्यात घरावर असणार जंगलराज’
कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोच्या सुरुवातीला जान्हवी किल्लेकर बिग बॉसकडून आलेले माहितीपत्रक वाचत आहे. ती वाचते, “या आठवड्यात घरावर असणार आहे जंगलराज, शिकाऱ्याची बंदूक जास्तीत जास्त वेळा मिळविणारी टीम या कार्यात यशस्वी होईल!” असे तिने वाचताच सगळ्या स्पर्धकांना धक्का बसल्याचे दिसते. त्यानंतर धनंजय म्हणतो, “आपल्याला षडयंत्र वापरायला लागणार.” अरबाज त्याच्या ग्रुपमधील सदस्यांना सांगताना म्हणतो, “काहीही करा लीड करायचीय आपल्याला.” निक्की म्हणते, “टीम ही कशीही वाचलीच पाहिजे.” प्रोमोच्या शेवटी जान्हवीला लागले असून, ती खाली पडल्याचे दिसते. अभिजीत, तिला पाणी द्या, पाणी द्या असे बोलत असल्याचे ऐकायला येत आहे.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने, ‘घरावर असणार जंगलराज, बंदूक मिळवून कोण ठरणार खरा शिकारी?’, अशी कॅप्शन दिली आहे.
आता खेळात नक्की काय होणार, कोणते स्पर्धक कोणत्या टीममध्ये असणार, शिकाऱ्याची बंदूक मिळविण्यासाठी हे स्पर्धक कोणत्या युक्त्या वापरणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच या खेळात जी टीम यशस्वी होईल, पुढे त्यांची भूमिका काय असणार आणि ‘जंगलराज’मध्ये नक्की काय काय होणार, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, आर्याला शिक्षा म्हणून घराबाहेर काढण्यात आल्याने अनेक प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे. आम्ही शो बघणे सोडू, असे म्हटले आहे. नेटकऱ्यांनी बॉयकॉट निक्कीचा बिग बॉस, असे म्हणत आपला संताप व्यक्त केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्याबरोबरच जर लहान मुले शो बघतात म्हणून आर्याने निक्कीला मारल्याचे क्लिप दाखवू शकत नाही; मग निक्की जे वागते, बोलते, मोठ्यांचा अपमान करते, अरबाज आणि तिचे व्हिडीओदेखील दाखवू नका, असे म्हणत नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. आता बिग बॉसच्या घरात येणाऱ्या काळात काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.