Bigg Boss Marathi 5 हे पर्व पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. घरात पहिल्या दिवसापासून होणारी भांडणे, वाद-विवाद, पहिल्याच आठवड्यात घरात तयार झालेले गट, बिग बॉसने दिलेले टास्क, भाऊच्या धक्का एपिसोडमध्ये रितेश देशमुखकडून स्पर्धकांची झालेली कानउघडणी, काहीवेळा भावुक झालेले सदस्य अशा अनेक कारणांमुळे हा सीझन चांगलाच गाजताना दिसत आहे. याबरोबरच, या सदस्यांच्या खेळावर प्रेक्षक, कलाकार आपले मत व्यक्त करताना दिसतात. आता अभिनेत्री आरती सोळंकीने एका मुलाखतीदरम्यान पंढरीनाथ कांबळे कसा गेम खेळतो, याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
‘अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनेलला आरती सोळंकीने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी पंढरीनाथ कांबळेच्या खेळाबद्दल बोलताना तिने म्हटले, “पॅडी आधी काहीच करत नव्हता, ज्यावेळी रितेश देशमुखने त्याचे कान उघडले तेव्हापासून त्याचा गेम दिसायला लागला आहे.
मला वाटतं जेव्हा ग्रृप टास्क होतात त्यावेळी त्याने मोठी जबाबदारी घेऊन टास्क खेळला पाहिजे. कारण- मी पॅडीबरोबर ‘झुंज मराठमोळी’ नावाचा हा शो केला होता. त्या शोमध्ये पॅडी सगळ्यात छोटं काम स्वत:साठी घ्यायचा. तो सेफ खेळायचा. उदाहरण म्हणून सांगते, जेजुरीमध्ये एक टास्क होता. त्यामध्ये ३० किलोचा भंडारा घेऊन पायऱ्या चढायच्या होत्या. सगळ्यांनी काम वाटून घेतली. आम्ही चारजण उरलो होतो. मी, नेहा शितोळे, त्यागराज खाडीलकर आणि पॅडी असे चारजण होतो.
हेही वाचा: “जेव्हा वडिलांनी हेलन यांच्याशी दुसरे लग्न केले तेव्हा आईने…”, अरबाज खानने सांगितली आठवण
आता या चारजणांमध्ये त्यागराज आणि पॅडीने तो ३० किलोचा भंडारा उचलायला हवा होता. तर पॅडी म्हणाला, खोबऱ्याचा तुकडा तोडणार आणि तो पायरीवर ठेवणार. तो ३० किलोचा भंडारा मला उचलावा लागला आणि तो घेऊन मी वरती गेले. हे केलं नाही पाहिजे. तिथे होणाऱ्या प्रत्येक टास्कमध्ये तो सेफ खेळायचा. मला वाटतं असं खेळलं नाही पाहिजे, हरलो तर हरलो पण जबाबदारी मोठी घेतली पाहिजे.” असे वक्तव्य आरती सोळंकीने मुलाखतीदरम्यान केले आहे.
याबरोबरच, पॅडीने गेम सुधारला तर त्याला टॉप पाच स्पर्धकांमध्ये बघायला आवडेल, असेही अभिनेत्रीने म्हटले आहे.
दरम्यान, तिसऱ्या आठवड्यात दोन स्पर्धकांना घराला निरोप द्यावा लागला आहे. निखिल दामले आणि योगिता चव्हाण यांनी घराला निरोप दिला आहे. आता या आठवड्यात कोणाचा खेळ प्रेक्षकांना भुरळ घालतो आणि कोणता स्पर्धकाला रितेश देशमुखकडून आरसा दाखवला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.