Bigg Boss Marathi 5 वे पर्व सध्या मोठ्या चर्चेत असलेले पाहायला मिळते. अनेक कारणांमुळे कलाकारांची चर्चा होताना पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरात होणारी भांडणे, एकमेकांविषयी केलेली वक्तव्ये यामुळे हे स्पर्धक मोठ्या चर्चेत असल्याचे दिसते. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धकांचे वागणे त्या घरापुरते मर्यादित न राहता, त्याचे पडसाद बाहेरच्या जगावरही उमटताना दिसतात. या स्पर्धकांचा खेळ, त्यांची वक्तव्ये यांवर प्रेक्षक, कलाकार आणि आधीच्या पर्वातील स्पर्धक वक्तव्य करीत असल्याचे पाहायला मिळते. आता बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या मीनल शाहने जान्हवीच्या खेळाबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे.
काय म्हणाली मीनल?
मीनल शाहने नुकतीच ‘स्टार मराठी मीडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला जान्हवी किल्लेकरच्या खेळाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. अगोदरची आणि आताची जान्हवी यामध्ये काय फरक वाटतोय? एकंदरीत जान्हवीबद्दल तुझं मत काय आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना तिने म्हटले, “जान्हवीने वेळेत पलटी मारली, हे खूप चांगलं झालं. सुरुवातीला ती खूपच नकारात्मक वाटत होती. मला वाटतं की, जान्हवीला निक्कीच्या विरुद्ध खेळण्यासाठी टाकलं होतं; पण त्या एकत्र आल्या आणि त्यामुळे सुरुवातीचे एपिसोड खूपच निगेटिव्ह झाले. मला एपिसोड पाहावेसेच वाटत नव्हते.
तुम्हाला कोण आवडत नाही, हा प्रश्न विचारल्यावर त्यामध्ये जान्हवीचं नाव सर्वांत आधी होतं. प्रेक्षक आणि कलाकारांनादेखील जान्हवी ही नकोच होती. पण बरंय की, जान्हवीनं तिचा खेळ बदललाय. पण, मला असं वाटतं की, तिची प्रतिमा जी तयार झालीय, ती सुधारण्यासाठी थोडा वेळ लागेल. मी आशा करते की, ती सकारात्मकरीत्या बदलेल. पण तिचं असं होतं की, ती प्रयत्न करते; मात्र पुढे-मागे तिचा गेम घसरतोच. बघूया ती पुढे काय करते? प्रामाणिकपणे सांगायचं, तर मला ती वैयक्तिकरीत्या एवढी काही आवडत नाही.”
हेही वाचा: Munawar Faruqui : बिग बॉस विजेत्या मुनव्वर फारुकीला ठार मारण्याची धमकी, तडकाफडकी ‘या’ ठिकाणी रवाना
मीनल शाह ही बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. तिच्या खेळामुळे ती सातत्याने चर्चेत होती.
याबरोबरच महेशसर बिग बॉससारख्या शोसाठी परफेक्ट आहेत. त्यांना माहितेय की, स्पर्धकांना कसं सरळ करायचं आहे. महेशसरांच्या चावडीमध्ये धमाल असायची. त्याची आठवण येते, असे म्हणत मीनल शाहने आपले मत व्यक्त केले आहे.
आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात आणखी काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.