Bigg Boss Marathi 5 वे पर्व विविध कारणांनी सतत चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरात होणारे टास्क, स्पर्धकांमध्ये होत असलेले वाद, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची घेतलेली शाळा यामुळे हे पर्व सातत्याने चर्चेत आहे.
तसेच, घरातील स्पर्धकांचा खेळ, त्यांचे वागणे-बोलणे यांवर प्रेक्षक, कलाकार आणि आधीच्या पर्वातील स्पर्धक हे व्यक्त होताना दिसतात. आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने सूरच्या चव्हाणचा खेळ आणि रितेश देशमुखचे सूत्रसंचालन याविषयी भाष्य केले आहे.
काय म्हणाला शिव ठाकरे?
शिव ठाकरेने एका मुलाखतीत रितेश देशमुखबद्दल बोलताना म्हटले, “रितेशदादा आवडतोय. जेवढे महेश सर चांगले होते, बेस्ट होते. तसाच रितेशदादा आहे. सगळ्यांची वेगळी जागा असते. रितेशदादा तरुणाईबरोबर कनेक्ट होणारा आपला नवीन वाघ आहे. मजा येते त्याला बघायला.”
सूरज चव्हाणबद्दल काय वाटतं, या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले, “सूरज चव्हाण हा आपल्या मातीतला मुलगा आहे. आपल्या महाराष्ट्रातील चांगली गोष्ट ही आहे की रूप, रंग, पैसे याला महाराष्ट्रातील लोक जास्त भाव देत नाहीत. माणूस आणि माणुसकी जे जपतात, ते आवडतात. त्यामधला हा सूरज आहे; जो माणुसकी जपतो आणि म्हणूनच तो लोकांच्या मनात जागा करतो.”
शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होत आपल्या खेळ खेळण्याच्या पद्धतीने, स्वभावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. त्याबरोबरच ‘बिग बॉस १६’ मध्ये सहभागी होत शिव ठाकरेने टॉप २ पर्यंत मजल मारली होती. ‘एमटीव्ही रोडीज रायसिंग’, ‘खतरों के खिलाडी १३’ या शोंमध्ये शिव स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणच्या खेळाची सातत्याने चर्चा होताना दिसते. प्रेक्षकांचा सूरजला मोठा पाठिंबा असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखदेखील त्याच्या खेळाची अनेकदा प्रशंसा करताना दिसतो.
या आठवड्यात घरात निक्की आणि आर्यामध्ये मोठा कल्ला झाला होता. कॅप्टन्सी टाक्सदरम्यान त्यांच्यात झटापट होत आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली होती. त्याची शिक्षा म्हणून तिला घराबाहेर जावे लागले आहे. आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.