Bigg Boss Marathi 5 व्या पर्वातील स्पर्धकांची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा या सीझनचे सूत्रसंचालन करणाऱ्या रितेश देशमुखचीही होताना दिसते. प्रेक्षक भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण- भाऊचा धक्का या एपिसोडमध्ये रितेश देशमुख चुकलेल्या स्पर्धकांची ‘शाळा’ घेतो आणि बरोबर खेळणाऱ्या सदस्यांना शाबासकी देतो. आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीने भाऊचा धक्का या एपिसोडचा एक प्रोमो शेअर केला आहे.
स्पर्धक झाले भावुक
कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख मी सगळ्या सदस्यांना खूप मोठं सरप्राइज देणार आहे, असे म्हणत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो बिग बॉसच्या घरात प्रवेश करतो. त्याला पाहताच सर्व सदस्य आनंदित होतात आणि त्याची गळाभेट घेतात. त्यानंतर तो स्पर्धकांना म्हणतो, तुमच्यासाठी मी घरच इकडे आणतोय. व्हिडीओद्वारे स्पर्धकांची त्यांच्या घरच्यांशी भेट घडणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.
अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण असे सर्व सदस्य भावूक झाले असून, रितेश देशमुख त्यांना धीर देत असल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. स्पर्धक आपल्या मुलांना पाहून भावूक झाल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने, ‘रितेश भाऊ स्वतः घरात येणार, घरच्यांशी बोलून सगळ्यांचे आनंदाश्रू वाहणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
आता स्पर्धक आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यामध्ये नक्की काय बोलणे होणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. रितेश देशमुख घराच्या आत आल्यानंतर स्पर्धक आणि त्याच्यामध्ये काय संवाद होणार, तो कोणाला सल्ला देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: ‘मु. पो. बोंबिलवाडी’ रुपेरी पडद्यावर, २४ वर्षांनंतर गाजलेल्या नाटकाचे माध्यमांतर
दरम्यान, या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात आर्या आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या भांडणात आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली होती. त्यामुळे सुरुवातीला तिला जेलमध्ये टाकण्याची शिक्षा देण्यात आली; मात्र अंतिम निर्णय भाऊच्या धक्क्यावर होईल, असे म्हटले जातेय. भाऊच्या धक्क्यावर आर्याला तिच्या या कृत्यासाठी घराबाहेर जाण्याची शिक्षा दिली गेली आहे.
आता बिग बॉसच्या घरात पुढे काय होणार, कोणता स्पर्धक कोणावर भारी पडणार, कोणत्या स्पर्धकाचा खेळ प्रेक्षकांना आवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.