Bigg Boss Marathi 5 वे पर्व हे सतत चर्चेत असते. कोणत्या ना कोणत्या कारणाने या पर्वाची चर्चा रंगलेली दिसते. या पर्वातील पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची या आठवड्यात घरात एन्ट्री झाली. संग्राम चौगुले असे वाइल्ड कार्ड सदस्याचे नाव आहे. आता संग्राम चौगुलेने पंढरीनाथ कांबळेच्या खेळाचे कौतुक केल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये संग्राम चौगुले, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण व अरबाज पटेल हे एका ठिकाणी बसले आहेत. त्यांच्यामध्ये कॅप्टन्सी टास्कची चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
संग्राम चौगुलेने ‘या’ सदस्याच्या खेळाचे केले कौतुक
व्हिडीओच्या सुरुवातीला पंढरीनाथ कांबळे मोठ्याने हसताना दिसत आहे. संग्राम त्याला म्हणतो, “दादा तुम्ही खो-खो खेळत होता का? मूव्हमेंट होत्या ना त्या फोकसमध्ये होत्या. त्यावर पंढरीनाथ कांबळे म्हणतो, “साधारण एक निरीक्षण असतं की, आता काय करायला पाहिजे. लहानपणापासून तो स्वभावच आहे. हाताला लागायचं नाही.” सूरज चव्हाण म्हणतो, “पण भारी खेळला.” अरबाज पटेल पंढरीनाथ कांबळेला म्हणतो, “जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या हातात आला तेव्हा मी एकच ठरवलेलं की, काहीही होऊ दे; पण तुम्हाला सोडायचं नाही. जेव्हा आपण गेटकडे गेलो होतो. तुम्ही खाली पडला आणि मी तुमच्या अंगावर पडलो. तेव्हा तुमचं जॅकेट बरोबर हातात आलं होतं. फक्त मला वाटत होतं की, आता यांनी जॅकेट काढायला नाही पाहिजे.” त्यावर पंढरीनाथ म्हणतो, “शेवटी शेवटी मी तेच करणार होतो.”
संग्राम चौगुले घरात आल्यानंतर तो आणि निक्की तांबोळी यांच्यात मोठी भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले होते. जादुई विहिरीच्या टास्कमध्ये त्यांच्यात वाद झाले होते. आता येणाऱ्या काळात कोण कोणावर वरचढ ठरणार हे प्रेक्षकांना दिसणार आहे.
दरम्यान, आता या आठवड्याच्या शेवटी कोणता सदस्य बिग बॉसच्या घरातून निरोप घेणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. आर्या जाधव, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, वैभव चव्हाण, वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. याबरोबरच, भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख या आठवड्यात कोणत्या सदस्याचा क्लास घेणार आणि कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.