Bigg Boss Marathi 5 या पर्वातील सदस्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री योगिता चव्हाण मोठ्या चर्चेत आहे. आता बिग बॉसच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री आरती सोळंकीने तिच्यावर वक्तव्य केले आहे.
‘अल्ट्रा मराठी बझ’ या यूट्यूब चॅनेलला आरती सोळंकीने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी तिने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाविषयी, यामध्ये सहभागी झालेल्या सदस्यांविषयी आपले मत मांडले आहे.
योगिता चव्हाणबाबत काय म्हणाली अभिनेत्री?
आरती सोळंकीने या मुलाखतीदरम्यान योगिता चव्हाणविषयी बोलताना म्हटले, “मी स्वत: बिग बॉसमध्ये जाऊन आली आहे. बिग बॉस कधीही कोणालाही कोणाच्याही घरातून जबरदस्तीने खेचून आणत नाहीत. मग त्या योगिताने का जावं? सगळ्यांना माहितेय की हा शो कसा असतो. तुमची मेडिकल टेस्ट होते, त्यानंतर तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलं जातं आणि तरीही तुम्ही घरात आल्यावर रडारडी करता.
मी हे कधी म्हणेन की मला कंटाळा आलाय किंवा मी हे सहन करू शकत नाही, सातव्या-आठव्या आठवड्यात म्हणेन. बिग बॉस शो हा इतका लोकप्रिय आहे की, माहीतच असतं की तिथे भांडण होतं. मनाची तयारी जातानाच ठेवायची असते. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच तुमचं रडणे सुरू आहे. मग मी म्हणते की, तुम्ही बिग बॉसला मूर्ख बनवलंय आणि महाराष्ट्राला मूर्ख समजताय. यायचंच नव्हतं शोमध्ये, निघून जा तू घरी”, असे योगिता चव्हाणला उद्देशून आरती सोळंकीने म्हटले आहे.
हेही वाचा: Video: “या आठवड्यात एका हिरोचा जन्म झाला”, म्हणत रितेश देशमुखने केले सुरज चव्हाणचे कौतुक
दरम्यान, बिग बॉसच्या घरात गेल्यापासून योगिता चव्हाण मोठ्या चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात तिने भाऊचा धक्का एपिसोडमध्ये रितेश देशमुखला घरी जायचे असल्याचे म्हटले होते.
मात्र, कॅप्टन्सी टास्कदरम्यान योगिताने उत्तम खेळ खेळल्याचे पाहायला मिळाले. निक्की तांबोळा आणि योगिता चव्हाण कॅप्टन्सी टास्कदरम्यान एकमेकींना भिडल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. तिच्या नवऱ्यानेदेखील फ्लॉवर नहीं फायर है असे म्हणत तिचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घराचा दुसरा कॅप्टन अरबाज पटेल बनला आहे.
आता तिसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर कोणत्या स्पर्धकाला रितेश देशमुखकडून शाबासकी मिळणार आणि कोणत्या सदस्याची शाळा घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. याबरोबरच कोणता सदस्य बिग बॉसच्या घराला निरोप देणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd