Dhananjay Powar React on Anushree Mane Allegations : ‘बिग बॉस मराठी’चं सहावं पर्व नुकतंच सुरू झालं असून, अवघ्या आठवडाभरातच हा शो रंगात आला आहे. काही दिवसांपासून अनुश्री माने आणि राकेश बापट हे दोघे चांगलेच चर्चेत आहेत. अनुश्रीनं राकेशवर केलेल्या आरोपांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. ” ‘बिग बॉस’च्या घरात ‘राकेशनं माझा हात खेचला; माझ्या परवानगीशिवाय कोणीही हात लावू शकत नाही”, असं अनुश्री म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यानंतर राकेशला खूपच दु:ख झालं. नंतर या प्रकरणी अनेकांनी राकेशची बाजू घेत अनुश्रीला चांगलेच खडेबोल सुनावले. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या मागच्या पर्वातील धनंजय पोवारनंसुद्धा तिचे कान टोचले आहेत.

सतत कॅमेऱ्यावर दिसणं…

धनंजयनं व्हिडीओ शेअर करीत असं म्हटलंय, “राकेश बापटवर अनुश्रीनं जो आरोप केला आणि उगाच मुद्दा काढून जे भांडण केलं ते चुकीचं होतं. सगळ्यात आधी आम्हाला याची लाज वाटली की, आम्ही पुरुष आहोत. म्हणजे त्या माणसाने तुला विनंती केली तरी तू भांडलीस? त्यात तो बेड तुझा नव्हता, त्यामुळे त्यावर झोपण्याचासुद्धा तुला अधिकार नाही. तुला उठवलं गेलं आणि तू उठलीसुद्धा होतीस, तर भांडण का केलं? इतकी झोप आली होती, मग उठून बाजूला जाऊन झोपू शकली असतीस. इतकं सोपं आहे. सतत कॅमेऱ्यावर दिसणं गरजेचं आहे का? योग्य मुद्द्यावर तुझी बाजू मांड, योग्य ते बोल तर तू नक्कीच दिसशील.”

१०० कॅमेरे असताना तुम्ही…

त्यानंतर धनंजय म्हणाला, “त्या प्रकरणी सागर कारंडेसुद्धा म्हणाले की, ‘तुमच्याशी बोलताना मलाही भीती वाटते’. अगदी योग्य आहे. या मुली असं वागतील, तर यांच्याशी कोण बोलेल? मला हातच लावला, मला हेच केलं; तेच केलं आणि अशा लहानसहान गोष्टीवरून भांडण कराल, तर तुम्हाला कुणीच सपोर्ट करणार नाही. तुम्ही कसेही झोपलेला असता, असं म्हणता; पण घरात १०० कॅमेरे असताना तुम्ही कसेही कसं काय झोपू शकता.”

यावर रितेश सरांनीसुद्धा…

पुढे धनंजय सांगतो, “आम्हीसुद्धा त्या घरात होतो. एकत्र बसायचो, सगळं काही करत होतो. कारण- तेव्हा आमच्या कुणाच्याच मनात तो भाव नव्हता. कुणीही अगदी सहज अलगद जवळ घेत होतं. अनेक मुली त्या सीझनमध्ये होत्या, ज्या येऊन आमच्याशी स्वत:हून बोलायच्या, भेटायच्या. या गोष्टी तुम्हीसुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. त्यावर आता रितेशसरांनीसुद्धा काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे. जी भूमिका आमच्या वेळी घेतली गेली होती, तशीच भूमिका त्यांनी आता यांच्यासाठीसुद्धा घेणं गरजेचं आहे.