Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या दोन ग्रुप्स आहेत. यातील पहिला ग्रुप म्हणजे टोळी…शो सुरू झाल्यापासून विशालच्या टोळीत रोशन, रुचिता, अनुश्री हे सदस्य आहेत. तर, दुसरा ग्रुप आहे रोशन, प्रभू, दिपाली आणि तन्वी या चौघांचा काटा ग्रुप. मात्र, आता या खेळात मोठा ट्विस्ट येणार आहे. भाऊच्या धक्क्यावर विशालला अनुश्रीची चुगली दाखवण्यात आली होती. यामुळे त्याच्या मनात अनुश्रीबद्दल शंका निर्माण झाली आहे.
याशिवाय रुचिता-रोशन यांचा देखील अनुश्रीवर आधीसारखा विश्वास नाहीये. याबाबत टोळीने एकत्र येऊन अनुश्रीला जाब सुद्धा विचारला होता. “तू नेमकी कोणाला सपोर्ट करणार आहेस?” असं विशालने तिला स्पष्टपणे विचारलं होतं. याशिवाय रुचिता देखील “तू आम्हाला फसवतेय तरीही आम्ही तुला सहन करतोय” असं थेट अनुश्रीला म्हणाली होती.
पण, अनुश्रीने या तिघांनाही “मी प्रत्येक टास्कमध्ये तुमच्या बाजूने बोलतेय. बहुमत मिळवण्यासाठी मला विरुद्ध टीमशी सुद्धा नीट वागावं लागतं…जे चुकीचं आहे त्या विरोधात मी कायम स्वत:चं म्हणणं मांडते.” असं स्पष्टीकरण दिलं होतं. पण, आता या मतभेदांचं रुपांतर मोठ्या वादात होणार आहे. यामुळेच अनुश्री टोळीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार आहे.
‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सुरू होऊन आता जवळपास ४५ दिवस पूर्ण झाले आहेत. पहिल्या दिवसापासून टोळीबरोबर खेळणारी अनुश्री आता तिच्या ग्रुपला सोडचिठ्ठी देणार आहे.
कॅप्टन्सी टास्कदरम्यान अनुश्री विशाल-रुचिताला संताप व्यक्त करत म्हणते, “तुम्ही इथे बोलत होतात…आम्हाला अनुश्री टोळीत नकोय. मी दररोज तुम्हा सगळ्यांची काळजी घेते…मी किती Efforts घेऊन सगळं करते. पण, तुम्ही कुणी माझ्यासाठी काहीच करत नाही. आता बास… मी टोळी सोडतेय.”
हे सगळं ऐकून विशाल अनुश्रीवर भडकतो आणि म्हणतो, “तुझ्यासारखा ड्रामा आम्ही करत नाही… तुला आम्ही टोळीत ठेवतच नाहीये.” पुढे अनुश्री त्याला सांगते, “ठेवत नाही बोलू नकोस…मला तुमच्यात राहायचं पण नाहीये. तुझी हाजी-हाजी करायला आम्ही इथे आलोय का?”
आता अनुश्री विरुद्ध टोळी हा मोठा ड्रामा प्रेक्षकांना ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळेल. खूप दिवसांनी का होईना पण अनुश्री आता घरात स्वत:चा एक स्टँड घेत तिचं म्हणणं ठामपणे सर्वांसमोर मांडणार आहे.
मात्र, या सगळ्यात फक्त अनुश्रीच नव्हे तर रुचिता सुद्धा विशालवर नाराज असते. विशाल कधीच माझ्या बाजूने बोलत नाही असं तिचं म्हणणं आहे. त्यामुळे आता अनुश्री पाठोपाठ विशाल-रुचिताची मैत्रीत सुद्धा दुरावा येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना शोच्या आजच्या भागात पाहायला मिळतील.

