Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा एकूण १७ स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये ‘३६ गुणी जोडी’ फेम लोकप्रिय अभिनेता आयुष संजीवचा देखील समावेश आहे. आयुष व अभिनेत्री तन्वी कोलते यांनी एकत्र जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर करत ‘बिग बॉस’च्या मंचावर दणक्यात एन्ट्री घेतली आहे. यावेळी रितेश देशमुखने या दोघांचंही नव्याकोऱ्या सीझनमध्ये मनापासून स्वागत केलं.

आयुषला त्याला आजवरच्या प्रवासाविषयी रितेशने विचारलं असता तो म्हणाला, “सर एक छोटीशी स्टोरी सांगतो…मी बिग बॉसमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलेलं आहे. तिथून आज इथपर्यंत पोहोचायला मला आठ वर्षे लागली आहेत आणि या आठ वर्षात मी खूप-खूप मेहनत केलीये. सर ही मेहनत मी पुन्हा बॅकग्राऊंडला जाण्यासाठी नाही केलीये. नक्कीच मी या संधीचं सोनं करेन.”

“माझ्या बाबांच्या पिढीने साहेबांकडून ( विलासराव देशमुख ) कायम आदर्श घेतला, त्यांचे विचार आत्मसात केले आणि सर, आज आमची पिढी तुम्हाला आदर्श मानते. माझं एक छोटंसं स्वप्न आहे…मी सलमान सरांचा फॅन आहे आणि तुमचं सुद्धा मराठी-हिंदी इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे. पुढच्या १० ते १२ वर्षांत मलाही ‘बिग बॉस’ होस्ट करायचंय हे माझं स्वप्न आहे सर…”

रितेश याबद्दल म्हणाला, “आयुष तुमची स्वप्नं खूप मोठी आहेत आणि अशीच स्वप्नं प्रत्येकाने पाहिली पाहिजेत. सर्वांनी लक्ष ठेवा… कायम आपली स्वप्न पूर्ण करा. तुम्ही साहेबांची…म्हणजेच माझ्या वडिलांची यानिमित्ताने आठवण काढलीत. यासाठी मी तुमचा अत्यंत आभारी आहे.”

आयुष पुढे म्हणाला, “सर साहेबांच्या आठवणी कधीच कोणी विसरू शकत नाही. तुम्ही जसं म्हणालात…अगदी त्याचप्रमाणे साहेबांचं नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वांच्या मनावर कोरलं गेलं आहे. त्यांना कधीच कोणीही विसरू शकत नाही.”

दरम्यान, आयुष संजीवने काही दिवसांपूर्वी, ‘इथून पुढे माझी टीम माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हँडल करेल, मी सोशल मीडियावर सक्रिय नसेन’ अशा आशयाची स्टोरी पोस्ट केली होती. याचवेळी प्रेक्षकांना आयुष ‘बिग बॉस’च्या घरी एन्ट्री घेणार आहे अशी हिंट मिळाली होती. आयुषने आजवर त्याच्या अभिनयाने, डान्सने सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. आता ‘बिग बॉस’च्या घरात तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.