Bigg Boss Marathi 6 Eviction : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या ११ वा आठवडा सुरू असून, खेळाचे एकूण ७५ दिवस पूर्ण झाले आहेत. हा संपूर्ण आठवडा स्पर्धकांसाठी खूपच इमोशनल होता. कारण, खेळाच्या अंतिम टप्प्यावर घरात सदस्यांना भेटायला आले होते त्यांचे कुटुंबीय. आपल्या जिवलगांना भेटून सगळेच भावुक झाले होते. याशिवाय या सदस्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी खेळाविषयीचे काही महत्त्वाचे सल्ले सुद्धा दिले. आता वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर नॉमिनेट असलेल्या सात सदस्यांपैकी एक जण घराबाहेर जाणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात अशा सदस्यांना नॉमिनेट करण्यात आलं होतं जे कठपुतली आहेत…दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर खेळतात, ज्यांच्याकडे स्वत:चा गेम नाही. या टास्कमध्ये घरातील एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले. यांच्यामध्ये दिपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरासे, अनुश्री माने, सागर कारंडे, संकेत पाठक या सात सदस्यांचा समावेश आहे. आता या सात जणांमध्ये कोण बाहेर जाणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं, अखेर घराबाहेर झालेल्या सदस्याचं नाव सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार या आठवड्यात छोटा डॉन प्रभू शेळके घराबाहेर गेला आहे. प्रभूचा काही खेळ नाही, त्याला स्वत:चं मत नाही, तो केवळ सिंपथी कार्ड प्ले करतो असं अनेकांचं मत होतं…त्याच्याआधी घराबाहेर आलेले स्पर्धक सुद्धा प्रभूवर अनेक आरोप करत होते. अखेर प्रभूची घरातून एक्झिट झाली आहे. प्रभूच्या एक्झिटनंतर त्याच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे.
अद्याप कलर्स मराठीकडून याबाबत कोणतीही घोषण करण्यात आलेली नाहीये. आता रितेश देशमुख उद्या भाऊच्या धक्क्यावर अधिकृतपणे नेमकं घराबाहेर कोण गेलंय त्या सदस्याचं नाव जाहीर करेल.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’बद्दल सांगायचं झालं तर, या आठवड्यात पुन्हा एकदा घराची कॅप्टन झालीये तन्वी कोलते. तन्वी या सीझनमध्ये दुसऱ्यांदा कॅप्टन झालीये आणि आता पुढच्या आठवड्यात ती सेफ असणार आहे. आता तन्वीच्या कॅप्टन्सीमध्ये घरात काय-काय ड्रामा घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय प्रभू घराबाहेर गेल्यावर तन्वीला सुद्धा धक्का बसणार आहे.
