Bigg Boss Marathi 6 Contestant Tanvi Kolte : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनला दणक्यात सुरुवात झालेली आहे. आता पुढचे १०० दिवस रोज रात्री आठ वाजता प्रेक्षकांना हा शो ‘कलर्स मराठी’वर पाहता येईल. रितेश देशमुखच्या उपस्थितीत नुकताच ‘बिग बॉस मराठी’चा भव्यदिव्य ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. घरात एकूण १७ स्पर्धकांनी प्रवेश घेतला असून यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं छोट्या पडद्यावरच्या Cool सूनबाईंनी…ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेत सिद्धूच्या सख्ख्या बहिणीची म्हणजेच सिंचनाची भूमिका अभिनेत्री तन्वी कोलते साकारत आहे. सिंचना सिद्धूची बहीण आणि लक्ष्मी-श्रीनिवास यांची धाकटी सून आहे. आता इथून पुढे सिंचनाच्या रुपात तन्वी कोलते आपल्याला या मालिकेत दिसणार नाहीये. कारण, अभिनेत्रीने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला रामराम करून ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये एन्ट्री घेतली आहे. आता शो संपल्यावर ती पुन्हा मालिकेत परतणार की, ‘लक्ष्मी निवास’मध्ये सिंचनाच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट येणार हे लवकरच स्पष्ट होईल.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात तन्वीची अनपेक्षित एन्ट्री झालेली आहे. कारण, मालिका सोडून ती शोमध्ये प्रवेश करेल असा अंदाज कोणीही बांधला नव्हता. ग्रँड प्रीमियरमध्ये तन्वी व आयुष संजीव या दोघांनी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर करत सर्वांची मनं जिंकून घेतली. यानंतर रितेशला पाहताच तन्वी त्याला म्हणाली, “सर प्लीज माझ्या हाताला चिमटा काढा! कारण, मी शोमध्ये आलेय, तुमच्यासमोर उभी आहे यावर माझा खरंच विश्वास बसत नाहीये.”
या समाजात आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, आघाडीची अभिनेत्री व्हायचं असं स्वप्न उराशी बाळगून तन्वी मुंबईत आली होती. या शोच्या माध्यमातून तिला स्वत:ला सिद्ध करायचं आहे. तन्वीला घरात प्रवेश करण्यासाठी रितेशने दोन पर्याय दिले होते. पहिला पर्याय होता ‘शॉर्टकट दार’ यामध्ये स्पर्धकांना ‘पॉवर Key’ सुद्धा दिली जाते. तर, दुसरं दार आहे मेहनतीचं दार…या दारातून एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांना मेहनत व कष्ट करावे लागतील अशी माहिती रितेशने दिल्यावर तन्वीने शॉर्टकटचं दार निवडलं.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेमुळे तन्वीला घराघरांत कूल सुनबाई ही ओळख मिळाली होती. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ती कसा खेळ खेळणार, तिची स्ट्रॅटेजी काय असेल? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
