Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता सातव्या आठवड्याचा कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये दिपाली आणि विशाल यांच्यात जोरदार भांडण होईल. कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाद केल्यामुळे दिपाली संतापते आणि ती रागात विशालला खडेबोल सुनावते.
‘बिग बॉस’च्या घरात आता स्पष्टपणे दोन ग्रुप्स तयार झालेले दिसतात. एक आहे विशालची टोळी आणि दुसरा आहे काटा ग्रुप. या दुसऱ्या ग्रुपमध्ये राकेश, प्रभू, तन्वी आणि दिपाली हे चार सदस्य आहेत. राखी सध्या तरी तिचा वैयक्तिक गेम खेळताना दिसतेय. याशिवाय राखी या पर्वात स्पर्धक म्हणून नाहीतर केवळ स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाल्याच्या चर्चा आहेत. आता राखी १५ दिवस पूर्ण झाल्याने घराबाहेर येणार की, वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून तिचा गेम तसाच सुरू ठेवणार हे या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होईल. पण, त्याआधी विशाल-दिपालीमध्ये नेमका कशावरून वाद झालाय याबद्दल जाणून घेऊयात…
विशाल आणि रुचितामध्ये कालच्या भागात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यावरूनच दिपाली त्याला सुनावणार आहे. दिपाली त्याला रागात म्हणते, “क्या बात है? घराचा कॅप्टन कसा असावा…विशालसारखा! जेव्हा ज्याला गरज असते त्याच्या बाजूने उभं राहायचं नाही त्या व्यक्तीला मध्येच सोडून द्यायचं. मग म्हणणार…मी काय ठेका घेतलाय तुमचा”
दिपालीचे हे शब्द ऐकून रुचिताचे डोळे पाणावतात यावेळी अनुश्री तिला धीर देत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. कारण, रुचिता सुद्धा विशालला कायम तू माझ्यासाठी कधीच स्टँड घेत नाहीस असं म्हणत असते.
दिपालीने सुनावल्यावर विशाल तिला म्हणतो, “चल जा आता काढलं तुला… तू कॅप्टन नाही होणार.” यावर दिपाली पुढे त्याला ठणकावून सांगते, “चालेल मला! तुझ्यासारखी टोळीची मेन बॉस मी होणार नाही.”
दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “वाह दिपाली”, “एक नंबर ताई गरज होती याची”, “वाह दिपाली Welldone”, “खेल गई दिपाली एक नंबर फायर आहेस तू”, “काय सुनावलंय दिपालीने गरज होती या सगळ्याची”, “वाह वाह दिपाली मजा आली” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

