Bigg Boss Marathi 6: बिग बॉस हा असा रिअॅलिटी शो आहे, ज्यामध्ये सतत काहीतरी वेगळे पाहायला मिळते. जे सदस्य भांडतात, तेच पुन्हा एकत्र दिसतात. कधी ते भावूकही होतात. या सगळ्यात त्यांना त्यांच्या घरच्यांची आठवण सतत येत असल्याचे पाहायला मिळते.
बिग बॉस मराठी ६ व्या पर्वात सध्या फॅमिली वीक सुरू आहे. स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी घरात येत आहेत. यावेळी सर्व जण भावूक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान, कुटुंबीय स्पर्धकांना त्यांच्या खेळाबद्दल सांगत आहेत. आता कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.
दिपाली सय्यदला अश्रू अनावर
या प्रोममध्ये पाहायला मिळते की, दिपाली सय्यद यांचे कुटुंब त्यांना भेटण्यासाठी आले आहे. त्यांचे पती व त्यांचा मुलगा त्यांना भेटण्यासाठी घरात येतात. त्यावेळी सगळेच भावूक होतात. दिपाली रडते. पुढे ती मम्मी कशी आहे, असे विचारते. त्यावेळी तिला त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दिपालीला अश्रू अनावर होतात. ती प्रचंड रडत असल्याचे दिसत आहे. याबरोबरच तिचे पती बॉबी खान व मुलगा अलीदेखील रडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, ‘कुटुंबाच्या भेटीनं दिपालीच्या चेहऱ्यावर उमटलं हसू; पण मम्मीची आठवण काढताच त्यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर’, अशी कॅप्शन दिली आहे.
आता या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. “ताई, खचून जाऊ नका”, “दिपाली यांच्या सासू शो सुरू झाला, तेव्हाच वारल्या; पण त्यांना सांगण्यात आलं नाही. ते आता माहीत झालं म्हणून त्या रडत आहेत”, “त्यांच्या सासूचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं, त्यांचंही सासूवर प्रेम होतं. सासूचं निधन झाल्याचं दिपालीताईंना माहीत नाही आणि म्हणून त्या रडत आहेत”, “दिपालीताई धीर सोडू नका”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
बॉबी खान यांनी आईचे निधन झाल्यानंतर ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली होती. यावेळी ते म्हणाले होते की, दिपाली व त्यांची आई एकमेकींच्या जवळ होत्या. आम्ही दिपालीला आईबद्दल अद्याप सांगितलेलं नाही. कारण- ती चांगला खेळ खेळतेय. जे व्हायचे होते ते झाले.
दरम्यान, बिग बॉसच्या घरात आणखी काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
