Bigg Boss Marathi 6 Divya Shinde Ejected : ‘बिग बॉस मराठी ६’ या शोमधून दिव्या शिंदेला गेल्या आठवड्यात निष्कासित करण्यात आलं. घरातील अन्य सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शोमधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेने पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना दिव्याने घडलेल्या संपूर्ण घटनेबाबत स्पष्टीकरण देत तिची बाजू मांडली आहे.

दिव्या म्हणाली, “जे लोक वैचारिक आहेत त्यांच्यासाठी तलवार स्वाभिमानी आहे, वैचारिक आहे, अभिमानाची आहे, माजाची आहे आणि मानाची आहे… सांविधानिक देशात कुणी खरी तलवार थोडीच घेऊन जाणारे…महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मला फोर्स केला. मी त्यांना घरात १०० वेळा सांगितलं होतं की, मी बाहेरचं बोलणार नाही. कारण, तुम्ही तेवढं समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीये.”

“जो वर्ग मला नेहमी ऐकत आलाय…त्यांना या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला वाटतं. महाराष्ट्रात ज्यांनी माझ्या विरोधात पोस्ट टाकल्या…त्यांनी ‘बिग बॉस’ला एकच प्रश्न करावा की, ती पूर्ण क्लिप दाखवा. मला ‘बिग बॉस’कडून जेव्हा थांबवण्यात आलं तेव्हा मी ओरडत होते की, माझं पूर्ण ऐकून घ्या; जे त्यांनी तुम्हाला, संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये. राकेश बापट, ओमकार राऊत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे यांच्याबरोबर जो माझा संवाद सुरूये…तो संपूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे. त्या संवादामध्ये मी हे सांगतेय की, ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल. मी ती शाब्दिक तलवार बिग बॉसमध्ये घेऊन आलेले नाहीये. कारण, सगळ्या सदस्यांना मी १०० वेळा सांगितलं होतं की, बाहेरची बाजू मी इथे कधीच दाखवणार नाही. कारण, माझे शब्द जे असतील विद्रोह, बंडखोरी, अन्यायाविरोधात न्यायाची मागणी करणं हे तुम्हाला कदाचित कळणार नाहीत. त्यामुळे मी या शब्दांचा उच्चार इथे करणार नाही. कारण, मी एक खेळाडू आहे. त्यानंतर प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकू येत होती…की ही भाषणासारखीच बोलते…ही भाषण करते. मी त्यांना वेळोवेळी सांगत होते…तुम्ही माझ्या भाषणावरती बोलू नका.” असं स्पष्ट मत दिव्याने मांडलं आहे.

दिव्या घरात नेमकं काय म्हणाली होती?

दिव्याने टास्कदरम्यान घरातील अन्य सदस्यांना धमकी दिली होती. यावेळी ती म्हणाली होती, “मी बाहेर ‘सरकार’ म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भलेही ती तलवार आता घरी असेल…याचा अर्थ असा नाही की, मी इथल्या गोष्टी विसरेन…मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन. आता ती तलवार कोणावर चालवेन हे डिपेंड करतं तुम्ही माझ्याशी किती आणि कसे बोलताय.” याचमुळे तिला शोमधून निष्कासित करण्यात आलं आहे.