Bigg Boss Marathi 6 Divya Shinde Controversy : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमधून दिव्या शिंदेला निष्कासित करण्यात आलं आहे. टास्क संपल्यावर दिव्याने घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच यानंतर ‘हो मी धमकीच दिली’ असं ती वारंवार सांगत होती. दिव्याने माफी मागण्यासही नकार दिला होता. परिणामी, तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
‘बिग बॉस’ने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी जाहीर केला. यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. घराबाहेर आल्यावर दिव्या नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
अखेर Bigg Boss Marathi 6 मधून एक्झिट घेतल्यावर तिच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये दिव्याच्या टीमने तिच्या तमाम चाहत्यांचे आभार मानत एक विनंती केली आहे.
दिव्या शिंदेच्या टीमकडून पोस्ट
“आम्ही समजू शकतो की, ‘बिग बॉस मराठी’ शोमधून दिव्या शिंदेची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावुक झालेत तर काहींना धक्का बसला आहे. पण, तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्वकाही आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्वांना एक विनंती करतो, कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची, अर्धवट माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि पुढील अपडेट्स आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. थँक्यू! टीम दिव्या शिंदे.” असं या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

दरम्यान, आता दिव्या शिंदे या प्रकरणावर कधी भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिव्याला घराबाहेर काढण्याआधी ‘बिग बॉस’ने अनेकदा तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता. इतकंच नव्हे तर कन्फेशन रूममध्ये राकेश बापटने सुद्धा भावाच्या नात्याने दिव्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या. पण, दिव्या तिच्या मतावर शेवटपर्यंत ठाम होती. तसेच मी कोणाचीही माफी मागणार नाही असंही दिव्याने ठामपणे सांगितलं होतं.
